औरंगाबाद : एका एमबीबीएस डॉक्टर तरुणीने परदेशात राहणाऱ्या आपल्याच आत्या आणि मामाला कोट्यवधी रूपयांनी लुटले आहे. विश्वासाने आपल्या भाचीवर मालमत्ता सोपवणे आत्याला चांगलेच महागात पडले आहे.
वाहनचालकाच्या मदतीने सुकेशिनी येरमे या तरूणीने आत्याला दोन कोटी रुपयांनी गंडवले आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी वाहनचालकासह या तरुणीला बेड्या ठोकल्या आहेत.
औरंगाबादेतील डॉ. शिवाजी गुणाले आणि वत्सला गुणाले हे दाम्पत्य गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत राहतं. त्यांचा सिडको एन 4 मध्ये बंगला आहे. गंडा घातलेली तरूणी सुकेशिनी ही वत्सला यांच्या भावाची मुलगी. ती बालपणापासून शिक्षणासाठी गुणाले दाम्पत्याकडे राहत होती.
महत्वाची गोष्ट म्हणजे ही तरूणी एमजीएम कॉलेजमध्ये एमबीबीएस करत होती. तीन वर्षांपूर्वी एमबीबीएससाठी तिने प्रवेश घेतला. कॉलेज पूर्ण होईपर्यंत गुणाले दाम्पत्याने मोठ्या विश्वासाने सुकेशिनीच्या ताब्यात हा बंगला दिला. इतकेच नाहीतर सुकेशिनीला कॉलेजला ये-जा करण्यासाठी एक गाडी आणि सोबत ड्रायव्हरही दिला.
आत्याची प्रॉपर्टी हडपण्याचा तरुणीचा डाव होता. सुकेशिनी आणि ड्रायव्हर माटे यांनी मिळून वत्सला यांच्या एटीएम कार्डमधून पाच लाख रुपये काढून घेतले. घरातील दागिनेही लंपास केले. इतकेच नाहीतर औरंगाबाद शहरातील सिडको एन 4 भागातला अलिशान बंगलाही तरुणीने विकल्याची माहिती समोर आली आहे.