मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 672 बांधकामांवर कारवाई

मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. 500 मीटर परिसर मोकळा करण्यात आला आहे. एच पूर्व विभागाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली आहे. 

Updated: Mar 1, 2024, 09:55 PM IST
मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 672 बांधकामांवर कारवाई  title=

Mumbai BMC Action Mithi River : मिठी नदीच्या रुंदीकरणात अडथळा निर्माण होण्यास कारणीभूत ठरलेल्या 672 झोपड्या तसेच अन्य अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात आली.  मुंबई महानगरपालिकेच्या 'एच पूर्व' विभागाच्या वतीने करण्यात आली. या कार्यवाहीमुळे मिठी नदीचा सुमारे 500 मीटर भाग मोकळा झाला असून नदीपात्राची रुंदी 40 मीटरवरून 100 मीटरवर नेण्यास मदत होणार आहे. 

मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सह आयुक्त (परिमंडळ ३)  रणजित ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (एच पूर्व) स्वप्नजा क्षीरसागर यांच्या देखरेखीत ही कार्यवाही करण्यात आली. 

मिठी नदीतील सांडपाण्याचा प्रवाह योग्य करणे आणि प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्या अंतर्गत मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्ता बांधणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून तो मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी काम करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वेळोवेळी कार्यवाही करण्यात आली. ऑक्टोबर 2023 मध्ये बक्षी सिंग कंपाऊंड येथील 100 मीटरचा परिसर मोकळा करून पर्जन्य जलवाहिनी विभागास हस्तांतरित करण्यात आला. सद्यस्थितीत त्या ठिकाणी सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.  

याच धर्तीवर  मिठी नदीच्या पात्रात किंवा पात्रालगत अनधिकृतपणे झालेली बांधकामे निष्कासित करण्यासाठी एच पूर्व विभागाच्या वतीने  29 फेब्रुवारी आणि 1 मार्च  दरम्यान धडक मोहीम हाती घेण्यात आली. त्या अंतर्गत 672 झोपड्या तसेच अन्य बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मिठी नदीचा सुमारे 500 मीटर भाग मोकळा झाला. आता या संपूर्ण परिसरामध्ये मिठी नदीपात्राचे रुंदीकरण करणे, खोलीकरण करणे, संरक्षक भिंत बांधणे, सेवा रस्त्याचे बांधकाम करणे तसेच छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारा सांडपाणी अडवून मुख्य मलनि:सारण वाहिनीमध्ये वळविणे आदी कामे करण्यात येणार आहे. या मुळे मिठी नदीच्या पात्राची रुंदी 40 मीटरवरून 100 मीटर होईल. तसेच मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून अन्यत्र वळविल्यामुळे नदीमध्ये होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासही मदत होईल.