Aaditya Thackeray May Leave Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षातील माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे हेच त्यांच्या वडिलांना सोडून जाण्याची भाषा करतील अशी शक्यता शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेते मंडळी त्यांना सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याच्या मुद्द्यावरुन बोलताना शहाजी बापू पाटलांनी हा टोला लगावला.
एक दिवस आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडून जाण्याची भाषा करतील, असं 'काय झाडी, काय डोंगर' फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी परखड प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. अनेक नेते ठाकरेंची साथ का सोडत आहेत याबद्दल बोलताना शहाजी बापू पाटलांनी भाष्य केलं. "कोणत्याही नेत्याच्या आमदाराच्या चौकशी झाल्या म्हणून ते पक्ष सोडत नाहीत. कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तव परिस्थिती अशी झाली आहे की तिथे थांबण्यात काही अर्थ नाही अशी भावना त्यांच्या नेत्यामध्ये झाली आहे. त्यामुळे एक दिवस असा उगवेल की उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील," असं शहाजी बापू पाटलांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकटेच राहण्याची परिस्थिती येऊ शकते असं भाकीत सांगोला माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केले आहे.
आदित्य ठाकरे यांचे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे येत असल्याचा प्रश्न माजी आमदार शहाजी पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर शहाजी बापू पाटलांनी, "असं काहीही होणार नाही," असं म्हटलं यामागील कारणही त्यांनी सांगितलं. "कारण ठाकरे गटाकडे संख्याबळ नाही. जरी त्यांना हे (विरोधी पक्ष नेते) पद दिले तरी महाराष्ट्रात अतिशय निकृष्ठ काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव गाजेल," अशा शब्दांमध्ये शहाजी बापू पाटलांनी माजी पर्यटन मंत्र्यांची खिल्ली उडवल्याचं दिसून आले.