मध्य प्रदेशातील तरुण ब्राह्मण दांपत्यांना सरकारकडून एक ऑफर देण्यात आली आहे. मध्य प्रदेश सरकारच्या एका मंडळाच्या प्रमुखांनी चार मुलं जन्माला घालण्याचा निर्णय घेणाऱ्या तरुण ब्राह्मण जोडप्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं आहे. पंडित विष्णू राजोरिया हे परशुराम कल्याण मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना राज्य कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आहे.
भोपाळमधील एका कार्यक्रमात बोलताना विष्णी राजोरिया यांनी आपण आपल्या कुटुंबांवर लक्ष केंद्रित करणे थांबवल्यामुळे 'धर्मविरोधी' लोकांची संख्या वाढत आहे असं विधान केलं आहे. "मला तरुणांकडून फार आशा आहे. आपण ज्येष्ठांकडून फार अपेक्षा करु शकत नाही. तुम्ही हे नीट ऐका. तुम्ही आपल्या भविष्यातील पिढीसाठी जबाबदार असणार आहात. तुम्हालाच त्यांचं रक्षण करावं लागणार आहे. आता तरुण स्थिरावतात आणि एका अपत्यानंतर थांबतात. हे फारच समस्यापूर्ण आहे. मी तुम्हाला किमान चार मुलं जन्माला घालावीत अशी विनंती करतो", असं ते म्हणाले आहेत.
यानंतर त्यांनी चार मुलं जन्माला घातलील अशा दांपत्यांना परशुराम बोर्डाकडून 1 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं जाहीर केलं आहे. "मी बोर्डाचा अध्यक्ष असो किंवा नसो, पुरस्कार दिला जाईल," असं त्यांनी स्पष्ट केलं.
अनेक तरुणांनी आपल्याला आता शिक्षण फार महाग झाल्याचं सांगितलं असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. "कसं तरी तुम्ही हे शक्य केलं पाहिजे. पण मुलांना जन्म घालताना अजिबात मागे राहू नका. अन्यथा देशात धर्मविरोधी लोकांची संख्या वाढत जाईल," असं विष्णी राजोरिया यांनी सांगितलं आहे.