Pooja Khedkar: फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीने ओबीसी आणि अपंग कोट्याचा लाभ मिळविल्याप्रकरणी आरोपी असलेल्या माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला मोठा धक्का बसलाय. तिचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पूजा खेडकरने षडयंत्र रचून देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवली असल्याचे न्यायमूर्ती चंद्र धारी सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले.
यापूर्वी पूजा खेडकरला दिलेले अंतरिम अटकेचे संरक्षणही न्यायालयाने काढून टाकले आहे. ऑगस्ट महिन्यात पूजा खेडकरला अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. 31 जुलै रोजी UPSC ने खेडकरची उमेदवारी रद्द केली होती आणि तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि आयोगाच्या निवडीतून कायमचे काढून टाकले होते. यूपीएससीने तिला नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले होते.
ट्रायल कोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला. तपास यंत्रणेने याप्रकरणातील तपासाची व्याप्ती वाढवून पूर्ण निष्पक्षपणे तपास करण्याचे निर्देश ट्रायल कोर्टाने दिले होते. अटकपूर्व जामीन देण्यास नकार देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला पूजा खेडकरने आव्हान दिले आहे.
ती बनावट कागदपत्रे मिळवण्यासाठी पूजाच्या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांशी हातमिळवणी केली असण्याची दाट शक्यता असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तपासात फेरफार करण्याच्या पूजाच्या क्षमतेचा दाखला देत न्यायालयाने म्हटले की, याचिकाकर्ता यूपीएससीची फसवणूक करण्याच्या मोठ्या कटाचा भाग आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग 2023 बॅचची प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरवर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंग कोट्याचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी यूपीएससीने खेडकरच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. तपासानंतर यूपीएससीने तिची निवड रद्द केली होती. तिला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. तिला भविष्यातील परीक्षांना बसण्यासही मनाई करण्यात आली.
पूजा खेडकरच्या गैरवर्तणुकीच्या तपशीलवार आणि सखोल तपासात विविध गोष्टी उघड झाल्या. तिने नाव बदलून आपली ओळख चुकीची दर्शवून परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. खेडकरने तिच्या पालकांची नावे तसेच त्यांचे फोटो, सही, ईमेल आडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलल्याचे यूपीएससीने आपल्या निवेदनात म्हटले आहे.