राजधानी दिल्लीत (Delhi) पावसामुळे (Rain) एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. दिल्लीत शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. तरुणीने रेल्वे स्थानकबाहेर पावसामुळे साचलेल्या पाण्यात पाय टाकल्यानंतर विजेचा धक्का बसल्याने तिला जीव गमवावा लागला. यानंतर नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.
साक्षी अहुजा असं या तरुणीचं नाव आहे. ती पूर्व दिल्लीमधील प्रीत विहारमध्ये वास्तव्यास होती. पहाटे 5.30 वाजता ती रेल्वे स्थानकावर पोहोचली होती. यावेळी तिच्यासोबत दोन महिला आणि तीन मुलं होती. साचलेल्या पाण्यातू मार्ग काढत जात असताना तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र यावेळी विजेचा जोरदार धक्का बसल्याने तिने आपला जीव गमावला.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेलं होतं. पण उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक्झिट नंबर 1 वर ही दुर्घटना घडली. तसंच आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा तरुणी बेशुद्ध अवस्थेत होती अशी माहिती त्यांनी दिली आहे.
पोलिसांनी निवेदनात सांगितलं आहे की, "साक्षी अहुजा आणि तिची जखमी बहिण माधवी चोप्रा यांनी लेडी हरदिंगे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं".
पीडितेची बहीण माधवी चोप्राने त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा केल्याचा आरोप आरोप करत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळाच्या व्हिजुअल्समध्ये खांबाच्या खाली उघड्या इलेक्ट्रिक वायर दिसत आहे. यामुळेच ही दुर्घटना झाल्याची शंका आहे. रेल्वे आणि पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नेमका निष्काळजीपणा कोणी केला याचा तपास सुरु आहे.
"दिल्लीमध्ये आज सर्वाधिक 5 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली आणि पुढील दोन दिवस पाऊस सुरूच राहील," असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं आहे.
पुण्यात महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्यानंतर शॉक लागून त्याचा जागेवर मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून शनिवार असल्याने शाळा बंद होती अन्यथा पुण्यात मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात्त दोन मुले आणि पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरात अजयकुमार हा कामानिमित्त तिथून जात होता. त्याला अचानकपणे त्या तारांचा धक्का लागला. त्याला इतक्या जोरात शॉक बसला की यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मात्र, याबाबत महावितरण विभाग कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नसून पोलिस देखील तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला न्याय द्यावा, अशी मागणी अजयकुमार शर्मा यांच्या भावाने केली आहे.