गांधीनगर : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी सत्ताधारी भाजपने स्वत:ला अधिक मजबूत करण्यासाठी जोर लावलाय. तीन जुलैला काँग्रेसचे वरिष्ठ नेते कुंवरजी बावलिया यांना भाजपमध्ये आणून काँग्रेसला धक्का दिला होता. आता गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचे पुत्र महेंद्रसिंग वाघेला यांना पक्षात प्रवेश देऊन काँग्रेला जोरदार धक्का दिलाय. भाजपचे प्रदेश अध्यक्ष जीतू वाघानी यांनी सांगितले की, दोनवेळा आमदार आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंग वाघेला यांचे चिरंजीव महेंद्रसिंग हे भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
महेंद्रसिंग वाघेला दोन वेळा काँग्रेसचे आमदार झाले आहेत. त्यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीच्याआधी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नव्हती. तसेच ते कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी झाले नव्हते. महेंद्रसिंग वाघेला भाजपमध्ये दाखल झाल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे ताकद अधिक वाढली आहे.
त्यांनी २०१७ रोजी राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांच्याविरोधात मतदानाचा हक्क बजावला होता. तुम्ही भाजपमध्ये का सहभागी झाला, असा प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी ते म्हणालेत, गांधी यांची कार्यशैलीमुळे आपण पक्षाचा त्याग केलाय. भविष्यात गुजरातमध्ये आणि देशात पक्षाला काहीही अस्तित्व राहणार नाही. पक्ष पुन्हा भरारी घेणार नाही.
ही घडामोड घडली त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष गुजरातच्या दौऱ्यावर होते. ते रात्री उशिरापर्यंत गुजरातमध्ये होते. त्यांनी भगवान जगन्नाथ मंदिरात जाऊन 'मंगल आरती'त सहभागी झालेत.