Bhopal Crime: चोरी करण्याच्या नादात चोर कोणत्या थराला पोहोचतील हे सांगता येत नाही. चोरी यशस्वी व्हावी, आपण पकडले जाऊ नये यासाठी चोर काहीही करायला सज्ज असतात. असाच एक प्रकार भोपाळच्या बेरासिया येथे झाला आहे. या घटनेत मेंढपाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. जंगलात शेळ्या चरायला गेलेला हा मेंढपाळ अवघ्या १६ वर्षांचा होता.
ललारिया गावातील रहिवासी 16 वर्षीय जुबेर आरिफ खान शेळ्या पाळायचा. तो रोज सकाळी शेळ्या चरायला जंगलात जात असे. रविवारी सकाळी 10 वाजता तो शेळ्यांसह जंगलात गेला. पण सायंकाळी सहा वाजले तरी आरिफ घरी आला नाही. तो घरी न परतल्याने नातेवाईक त्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडले.
यादरम्यान ललारिया आणि सानोदा गावांच्या हद्दीतील नदीत झुबेरचा रक्ताने माखलेला मृतदेह पडलेला दिसला. त्याच्या डोक्यात मागच्या बाजूला धारदार शस्त्राने वार करून कोणीतरी त्याचा खून केला होता. तसेच मृतदेह नदीत फेकून देण्यात आल्याची माहिती बैरसिया ठाण्याचे प्रभारी गिरीश त्रिपाठी यांनी दिली. शेळ्या गायब झाल्यामुळे बकऱ्या चोरण्याच्या उद्देशाने जुबेरचा खून झाल्याचा अंदाज सुरुवातीला पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.
मेंढपाळाची हत्या करून मृतदेह नदीत फेकल्याची घटना बेरासिया येथून उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नात्यातील भावोजी- मेहुण्यासह पाच जणांना अटक केली आहे. घटनेनंतर खोलीत लपवून ठेवलेल्या बकऱ्याही जप्त करण्यात आल्या आहेत.
घटनेपूर्वी झुबेर हा लालरिया येथील 19 वर्षीय राजा शाह आणि सलमान उर्फ शोएब यांच्यासोबत दिसला होता. पोलिसांनी संशयाच्या आधारे दोघांची चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली. शोएब हा भोपाळमधील नार्याकखेडा येथील रहिवासी असून ललारिया येथे त्याचे सासरचे घर आहे. शोएबने आपला मेहुणा राजा याच्यासोबत बकऱ्या चोरण्याचा कट रचला होता. त्यासाठी त्याने फैज, आमिर आणि जाहिद यांना भोपाळहून पिकअप वाहन घेऊन बोलावले. इतर आरोपी साबोदरा नदीकडे शेळ्या चोरण्याच्या उद्देशाने आले होते.
योजनेनुसार बकर्या चरत असलेल्या जुबेरला राजा आणि शोएब यांनी नदीकाठच्या एका निर्जन ठिकाणी बोलावले. यादरम्यान राजाने जुबेरची कुऱ्हाडीने हत्या केली. यानंतर शेळ्या पिकअप वाहनात टाकण्यात आल्या. शोएबने बकऱ्या आपल्या घरी नेऊन बंद खोलीत ठेवल्या होत्या. या हत्येप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून आरोपीकडून 16 शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.