'हिंमत असेल तर सर्वांसमोर यमुना नदीत...', अरविंद केजरीवाल यांचं अमित शाह, राहुल गांधींना जाहीर आव्हान

Delhi Assembly Election 2025: दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या यमुनेच्या पाण्यात अमोनियाची पातळी झपाट्याने वाढल्याचा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तसंच ही प्रक्रिया प्रकल्पांच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न होता असा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 29, 2025, 06:34 PM IST
'हिंमत असेल तर सर्वांसमोर यमुना नदीत...', अरविंद केजरीवाल यांचं अमित शाह, राहुल गांधींना जाहीर आव्हान title=

Delhi Assembly Election 2025: आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना हिंमत असेल तर यमुना नदीचं पाणी जनतेसमोर पिऊन दाखवा असं जाहीर आव्हान दिलं आहे. शेजारी राज्य हरियाणा पाणी विषारी करत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी याआधी केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या आरोपांवरून वाद पेटला असतानाच अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील यमुनेच्या पाण्यात अमोनियाचे धोकादायक प्रमाण 7 भाग प्रति दशलक्ष (पीपीएम) आहे असा दावा केला आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यादरम्यान आज हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी यमुनातील पाणी पिऊन दाखवलं आहे.

केजरीवाल यांनी 7पीपीएम अमोनिया हे विषाच्या समतुल्य असल्याचं म्हटलं आहे. हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार नदी दूषित करत आहे, ज्यामुळे दिल्लीतील रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री आतिशी आणि मंत्री सौरभ भारद्वाज यांनीही केजरीवाल यांच्या दाव्याचे समर्थन केलं आहे. त्यांनी विरोधी नेत्यांना तेच पाणी पिण्याचं आव्हान दिलं आहे.

"अमित शाह, राजीव कुमार, राहुल गांधी, संदीप दीक्षित यांनी आता आम्हाला मीडियासमोर 7 पीपीएम अमोनिया असलेले हे पाणी पिऊ शकता हे दाखवून द्यावं. तुम्ही दिल्लीला 7 पीपीएम पाणी पाठवत आहात आणि केजरीवाल खोटे बोलत आहेत असा दावा करत आहात," असं ते म्हणाले. 

भाजपाची सत्ता असलेल्या हरियाणावरील त्यांच्या आरोपांना नेमका आधार काय? असं विचारलं असता ते म्हणाले की, "मग कोण जबाबदार आहे, पाणी पानिपतहून दिल्लीला येते?"

"जर असे दूषित पाणी जलशुद्धीकरण केंद्रांपर्यंत पोहोचले तर क्लोरिनेशन झाल्यास ते अत्यंत घातक ठरू शकते," असं केजरीवाल म्हणाले आहेत. त्यांनी पुरावा म्हणून जल बोर्डाच्या सीईओंच्या पत्राचा उल्लेखही केला.

दिल्लीला पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात अमोनियाची पातळी सुमारे 3 पीपीएम होती परंतु 21 जानेवारीनंतर ती 7 पीपीएमपर्यंत वाढल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या कामकाजात अडथळा आणण्याचा आणि आप विरोधात जनक्षोभ निर्माण करण्याचा हा डाव असल्याचा दावा त्यांनी केला.

केजरीवाल यांनी पहिल्यांदा दिल्लीतील निवडणूक सभेत हे आरोप केले आणि त्यानंतर त्यांचा पुनरुच्चार केला. भाजपाने यावर जोरदार टीका केली आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात खटला दाखल कऱण्याची धमकी दिली असून जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली आणि असं वक्तव्य देशाचा अपमान असल्याचे म्हटले. आपम स्वतः यमुनेचे पाणी पितो असंही ते म्हणाले आहेत. दिल्लीच ५ फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानिमित्ताने सुरु असलेल्या प्रचारात स्वच्छ पाणी कळीचा मुद्दा ठरत आहे.