Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमीजास्त होत असून, पर्वतीय क्षेत्र वगळता इथं मैदानी भागांमध्ये मात्र तापमानाच काही अंशांनी वाढ होत आहे. असं असलं तरीही पर्वतीय भागांकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं येथील हवेत गारठा कायम आहे. उलटपक्षी दक्षिण भारतामध्ये किनारपट्टी भागावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असतानाच मध्य भारत आणि महाराष्ट्रामध्येही तापमानात मोठे बदल होताना दिसत आहेत.
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र क्षेत्रासह कोकणातही दिवसा उष्मा वाढणार आहे. पुढील 48 तास ही परिस्थिती कायम असेल. पूर्वेकडून मुंबईकडे वाहणाऱ्या
उष्ण वाऱ्यांमुळे या आठवड्याचा शेवट अर्थात संपूर्ण शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे दिवस तापमानाचा आकडा 35 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. शहरात सुरु असणारी बांधकामं, काँक्रिटीकरण या साऱ्यामुळं तापमानातील दाहकता तुलनेनं आणखी वाढताना दिसणार आहे.
मुंबईमध्ये पुढील दोन ते तीन दिवस थंडी नाहीशी होत तापमान 37 अंशांचा आकडा गाठत नागरिकांच्या अडचणी वाढवू शकते असाही थेट इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. मुंबई शहर, नवी मुंबई, ठाणे, पालघर इथं तापमानाचा आकजडा धडकी भरवेल. त्यामुळं ऐन दुपारच्या वेळी बाहेर पडू नका असाही सल्ला दिला जात आहे.
राज्यातील कोकण क्षेत्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड अथं किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल. तर, पालघरमध्ये तापमान 36 अंशांवर पोहोचेल असंही हवामान विभागाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार वातावरणाच्या वरच्या स्तरात वाऱ्याची प्रतिचक्राकार स्थिती तयार होत असून, त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या वाटेच अडथळे निर्माण होत आहेत. दुसरीकडे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग मात्र वाढला आहे, याच कारणास्तव राज्यात तापमानवाढ पाहायला मिळतेय. ही परिस्थिती पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असून, त्यानंतर तापमानवाढीचा वेग मंदावेल असं सांगण्यात येत आहे.