मुंबई : आता जवळ जवळ सगळेच जण डिजीटल बँकिंगकडे वळले आहेत, ज्यामुळे लोकं आता हार्ड कॅश न ठेवता, गुगल पे किंवा कार्डने सर्वत्र पैसे देतात. बऱ्याचदा तुम्ही पेट्रोल पंप वरती पैसे देण्यासाठी कार्डचा पर्याय वापरला आहे आणि बरेच लोक रोजच्या वापरात देखील पेट्रोल भरण्यासाठी कार्ड स्वाईपचा पर्याय वापरतात. परंतु तुम्हाला माहितीय असं करणं तुम्हाला धोक्याचं ठरु शकतं. आजकाल हॅकर्स ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धतींद्वारे लोकांच्या बँक खात्यातून पैसे काढत आहेत फोडत आहेत. त्यात आता पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणाऱ्या लोकांना टार्गेट केलं जातं आहे. हे लोक एटीएम कार्ड हॅक करून त्याचा क्लोन तयार करतात आणि लोकांचं बँक अकाउंट खाली करतात.
सोमवारीच यूपी पोलिसांनी अशा एका टोळाचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे, तर त्यांचे तीन साथीदार फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक पेट्रोल पंपावर काम करणारा कर्मचारी आहे.
बीटा-2 स्टेशन प्रभारी अनिल कुमार सिंह यांनी सांगितले की, एका माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विकास, तरुण आणि पंकज यांना सोमवारी अटक केली.
तरुण हा आचार गावात असलेल्या पेट्रोल पंपावर कामाला होता. लोक जेव्हा पेट्रोल भरल्यानंतर कार्ड स्वाईप करण्यासाठी मशिन वापरायचे तेव्हा मग त्या कार्डची डिटेल्स हे भामटे आपल्या जवळ ठेवायचे.
चौकशीदरम्यान पोलिसांना कळले की, पेट्रोल पंपावर इंछन टाकणारे लोक जेव्हा इंधनाचे पैसे देण्यासाठी एटीएम कार्ड पुढे करायचे, तेव्हा आरोपी त्यांच्याजवळ असलेल्या स्कॅनर मशीनने एटीएम कार्ड स्कॅन करायचे आणि एटीएमचे क्लोनिंग करायचे. एवढेच नाही तर हे लोक जेव्हा मशिनमध्ये आपल्या कार्डचा पिन नंबर टाकायचे तेव्हा हे लोक तो पिननंबर देखील मिळवायचे, ज्यामुळे त्यांना लोकांचे बँक अकाउंट खाली करण्यात मदत व्हायची.
एसएचओने सांगितले की, एटीएम कार्डचे क्लोनिंग केल्यानंतर हे भामटे मुंबई, महाराष्ट्र आणि कोलकाता येथे राहणाऱ्या त्यांच्या मित्रांमार्फत पीडितांच्या खात्यातून पैसे काढायचे. ज्यामुळे ते लवकर पकडले गेले नव्हते. परंतु माहितीच्या आधारावर पोलिसांनी त्यांना पकडलंच.
चौकशीदरम्यान पोलिसांना असे समजले आहे की असे ठग नोएडा आणि ग्रेटर नोएडा परिसरातील अनेक पेट्रोल पंपांवर सेल्समन म्हणून काम करत आहेत, जे सामान्य लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करून त्यांच्या खात्यातून पैसे काढत आहेत.
या प्रकरणात आणखी काही जणांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी स्कॅनर मशीन, मोबाईल फोन जप्त केल्याचे स्टेशन प्रभारींनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपींनी आतापर्यंत हजाराहून अधिक लोकांचा एटीएम डेटा हॅक करून पैसे काढल्याची कबुली दिली आहे.