ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

Valentine's Day Lalit Prabhakar : व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम!

दिक्षा पाटील | Updated: Feb 14, 2025, 12:54 PM IST
ललित प्रभाकरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; व्हॅलेन्टाइनच्या दिवशी लव्हस्टोरी आणि व्हीएफएक्सचं अनोखं संगम! title=
(Photo Credit : PR Handover)

Valentine's Day Lalit Prabhakar : व्हॅलेन्टाइन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी सगळ्या प्रेक्षकांसाठी एक गोड आणि प्रेमळ भेट प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘प्रेमाची गोष्ट 2’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाची पहिली वहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असं म्हणतात, पण जेव्हा प्रेम आणि नशीब आपल्या प्लॅनिंगनुसार ठरेल तेव्हा आयुष्यात काय घडेल? असंच काही या चित्रपटात ललितच्या बाबतीत घडणार आहे. प्रेम आणि नशीबाची ही जादुई सफर पाहाणं नक्कीच मनोरंजक ठरेल. 

निर्माते संजय छाब्रिया या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले, "प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चित्रपटाची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणणं आमच्यासाठी खूप खास आहे. प्रेमाचा रंग आणखी गडद करणारी चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांना प्रेमाचा एक नवा अनुभव देईल. या चित्रपटात प्रेमाची जादू आणि तंत्रज्ञानाचा मिलाप असल्याने प्रेक्षकांना प्रेमाचा हा प्रवास नक्कीच आवडेल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणतात,"प्रेमकथा सर्वांच्याच आठवणीतल्या असतात. त्या काळाच्या पलीकडे ही टिकतात. मी याआधी ही काही प्रेमकथा सादर केल्या आहेत. ‘प्रेमाची गोष्ट 2’ ही माझी सातवी प्रेमकथा असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली अतिशय आधुनिक प्रेमकथा आजच्या पिढीला नक्कीच आवडेल. व्हॅलेंटाईन डेच्या वातावरणात ‘प्रेमाची गोष्ट 2’ ची अनोखी पहिली झलक म्हणजे आमच्याकडून प्रेक्षकांना एक विशेष रोमँटिक भेट आहे. ललित, ऋचा आणि रिधिमा यांचा अभिनय आणि अप्रतिम केमिस्ट्री चित्रपटाला खास रंगत आणेल. चित्रपटाच्या फर्स्ट लुकमध्ये प्रेम आणि नशीबाच्या खेळाची झलक पाहून प्रेक्षक चित्रपटाबद्दल उत्सुक आहेत."

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. प्रेक्षकांसाठी गाजलेल्या प्रेमकथा घेऊन येणारे सतीश राजवाडे आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आता आणखी एक प्रेमकथा घेऊन येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रेम आणि नशीबाचा हा जादुई प्रवास येत्या जून 2025 मध्ये अनुभवायला मिळेल.

हेही वाचा : Valentine's Day च्या दिवशी जगभरात किती लग्न होतात? आकडा थक्क करणारा

या चित्रपटात महाराष्ट्राचा लाडका अभिनेता ललित प्रभाकर प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेत्री ऋचा वैद्यसह हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडणारी अभिनेत्री रिधिमा पंडित ही चित्रपटात दिसेल. प्रेक्षकांना या तिन्ही कलाकारांची कमाल केमिस्ट्री पाहायला मिळेल. 'मुंबई-पुणे-मुंबई’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘ ती सध्या काय करते’, ‘ऑटोग्राफ’ अशा सुपरहिट प्रेमकथा सादर करणारे प्रख्यात दिग्दर्शक सतीश राजवाडे एक नवीन प्रेमकथा निर्माते संजय छाब्रिया यांच्यासह घेऊन येत आहेत.