जेव्हा सायरा बानो यांनी पतीला एक्स-गर्लफ्रेंडला भेटायला पाठवलं; दिलीप कुमार आणि मधुबालाची 'ती' भेट, म्हणाल्या 'तुम्ही...'

लग्नानंतर दिलीप कुमार यांना मधुबालाचा मेसेज आला होता. तिची त्यांना भेटण्याची इच्छा होती. दिलीप कुमार यांनी त्यावेळी आपल्या नवविवाहित पत्नी सायरा बानो यांना सांगितलं होतं.  

शिवराज यादव | Updated: Jan 13, 2025, 04:23 PM IST
जेव्हा सायरा बानो यांनी पतीला एक्स-गर्लफ्रेंडला भेटायला पाठवलं; दिलीप कुमार आणि मधुबालाची 'ती' भेट, म्हणाल्या 'तुम्ही...' title=

बॉलिवूडमध्ये अशा अनेक प्रेमकथा आहेत ज्यांचा शेवट गोड होऊ शकलेला नाही. या प्रेमकथा पडद्यापुरत्या मर्यादित राहिल्या. खऱ्या आयुष्यात त्यांचं प्रेम मात्र फक्त एक भूतकाळ राहिला. जेव्हा कधी बॉलिवूडच्या अशा जोड्यांची नावं घेतली जातात तेव्हा त्यामध्ये दिवंगत अभिनेते दिलीप कुमार आणि मधुबाला यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. 'मुघल-ए-आजम' चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांनी प्रचंड आवडली होती. दिलीप कुमार आणि मधुबाला एकमेकांच्या प्रचंड प्रेमात होते. दोघांची लग्न करण्याची इच्छाही होती. पण मधुबालाच्या कुटुंबाला नात्याला विरोध होता. 

दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्या प्रेमाची चर्चा त्यावेळी हिंदी इंडस्ट्रीमध्ये नेहमी होत असे. पण त्यांचं हे प्रेम अंतिम रुप घेऊ शकलं नाही. अखेर मधुबाला यांनी गायक किशोर कुमार आणि दिलीप कुमार यांनी सायरा बानो यांच्याशी लग्न करत आपल्या जोडीदारांसह आयुष्याचा नवा प्रवास सुरु केला. पण लग्नानंतर दिलीप कुमार आपलं मधुबाला यांच्या भेटीला पोहोचले होते. पण ते नेमकं का भेटले होते आणि त्यांच्यात काय बोलणं झालं होतं? हे जाणून घ्या.

लग्नानंतर दिलीप कुमार आणि मधुबाला यांची भेट

लग्नानंतर मधुबाला स्वत: दिलीप कुमार यांना भेटण्याची इच्छा होती. त्यांनी दिलीप कुमार यांना जेव्हा मला तुम्हाला भेटायचं आहे असं सांगितलं होतं तेव्हा त्यांच्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता. दिलीप कुमार यांनी आपल्यासाठी ही भेट फारच भावनात्मक होती असं म्हटलं आहे. दिलीप कुमार यांनी लग्नानंतर मधुबालासह झालेल्या भेटीचा उल्लेख आपल्या ऑटोबायोग्राफीत केला होता. आपली पत्नी सायरा बानोने स्वत: मला मधुबालाला भेटण्यास सांगितलं होतं असंही त्यांनी सांगितलं होतं. 

दिलीप कुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, "आमच्या निकाहनंतर काही दिवसांनी जेव्हा आम्ही मद्रासमध्ये होतो तेव्हा मला मधुबालाचा एक मेसेज मिळाला. तिला मला लगेच भेटायचं होतं. मी त्यामुळे आश्चर्यचकित झालो होतो. नेमकं कसं काय झालं आहे असा विचार सुरु होते. मुंबईत आल्यानंतर मी पत्नी सायराला याबद्दल सांगिललं. तिने मला तात्काळ जाऊन मधुबालाला भेटण्यास सांगितलं होतं. पण मला यामुळे सायरा थोडी चिंतीत झाल्याचंही मला वाटलं".

मधुबालाला भेटल्यानंतर फार दुखावले होते दिलीप कुमार

लग्नानंतर दिलीप कुमार जेव्हा आपली पूर्वाश्रमीची प्रेयसी मधुबालाच्या घरी पहिल्यांदा पोहोचले तेव्हा तिची अवस्था पाहून त्यांचं मन हेलावलं होतं. दिलीप कुमार यांनी सांगितलं की, 'मी जेव्हा मधुबालाच्या घरी गेलो, तेव्हा तिची अवस्था पाहून माझं मन दुखावलं होतं. तिचा चेहरा फिका पडला होता, ती खूप अशक्त झाली होती, ज्या सौंदर्यासाठी मधुबाला ओळखली जात होती ती गेली होती. पण मधुबाला तिच्या वेदना लपवून माझ्यासमोर उभी होती. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. मधुबाला म्हणाली, 'आमच्या राजकुमाराला अखेर त्याची राजकुमारी सापडली आहे, मी आता खूप आनंदी आहे'. 

मधुबालाने दिलीप कुमार यांना वैयक्तिक आयुष्यात काही सल्ला घेण्यासाठी फोन केला होता. मधुबालाने नात्यात असतानाही दिलीप कुमार यांच्याकडून वैयक्तिक आयुष्यावर अनेकदा सल्ला घेतला होता. दिलीप आणि मधुबाला यांची ही शेवटची भेट होती. यानंतर 23 फेब्रुवारी 1969 रोजी वयाच्या 36 व्या वर्षी मधुबालाचे निधन झाले.