Tuvalu Sinking Date : बदलते हवामान आणि ग्लोबल वार्मिंगचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अशातच काही देशांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पृथ्वीवरील एक सुंदर देश जगाच्या नकाशावरुन गायब होणार आहे. 25 वर्षानंतर हा देश समुद्रात बुडणार आहे. हा देश म्हणजे पॅसिफिक महासागरात हवाई आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान एक सुंदर पॉलिनेशियन बेट जाणून घेऊया हा देश कोणता?
तुवालु असे या देशाचे नाव आहे. येथे सुमारे 11 हजार लोक राहतात. हा देश 9 लहान बेटांनी बनलेला आहे. त्याच्या मुख्य बेटाचा आकार एका अरुंद पट्ट्यासारखा आहे. हा जगातील तिसरा सर्वात कमी लोकसंख्या असलेला सार्वभौम देश आहे. यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये फक्त व्हॅटिकन आणि नौरू यांचा समावेश आहे.
क्षेत्रफळाच्या बाबतीत देखील तुवालू हा देश जगातील चौथा सर्वात लहान देश आहे. व्हॅटिकन सिटी (0.44 चौ. किमी), मोनॅको (1.95 चौ. किमी) आणि नाउरू (21 वर्ग किमी) लहान आहेत. तर तुवालू हा देश फक्त 26 चौरस किमी क्षेत्रफळ इतका आहे.
19व्या शतकाच्या उत्तरार्धात हा देश युनायटेड किंगडमच्या प्रभावाखाली आला. 1892 ते 1916 पर्यंत येथे ब्रिटिश संरक्षित राज्य होते. 1916 ते 1974 दरम्यान गिल्बर्ट आणि एलिस आयलंड कॉलनीचा भाग होते. 1974 मध्ये, स्थानिक रहिवाशांनी स्वतंत्र ब्रिटिश आश्रित प्रदेश म्हणून राहण्यासाठी मतदान केले. 1978 मध्ये, तुवालू संपूर्ण स्वतंत्र देश म्हणून कॉमनवेल्थचा भाग बनला.
पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे या बेटाचा विनाश होत असून तो समुद्राच्या पाण्यात सतत बुडत आहे. व्हॅटिकन सिटी नंतर जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला देश तुवालु बेट आहे. येथे जेमतेम 11 हजार लोक राहतात. आपला तसेच भावी पिढ्यांचा जीव वाचवण्यासाठी येथील नागरिकांना स्थलांतर करावे लागणार आहे. त्यांच्याकडे हाच एक पर्याय आहे.
तुवालु देशाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून फक्त 2 मीटर आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तुवालूमधील समुद्राची पातळी 15 सेंटीमीटरने वाढली आहे, जी जागतिक सरासरीच्या दीड पट आहे. नासाने देखील तुवालु देशाच्या विनाशाचे भाकित वर्तवले आहे. तुवालुचे अर्धे मुख्य प्रवाळ फुनाफुती 2050 पर्यंत बुडतील अशी भिती व्यक्त केली जात आहे. 2025 मध्ये तुवालू आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात करार झाला होता. या अंतर्गत, 2025 पासून दरवर्षी 280 लोकांना ऑस्ट्रेलियात कायमचे विस्थापित केले जाईल जेणेकरून देश बुडण्यापूर्वीच यांचा जीव वाचवता येईल.