मुंबईत ‘आरटीई’चे फॉर्म निघाले; आठवी पर्यंत मोफत शिक्षण; पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

RTE Form Date 2025 : सन २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षाची आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया  १४ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार Eus.  बृहन्मुंबई परीक्षेत्रातील ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध आहेत.   

वनिता कांबळे | Updated: Jan 13, 2025, 11:47 PM IST
मुंबईत ‘आरटीई’चे फॉर्म निघाले; आठवी पर्यंत मोफत शिक्षण; पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी title=

Maharashtra RTE admission 2025:  "बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ " (आर.टी.ई.) अंतर्गत सन २०२५ - २६ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेला मंगळवार दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून सुरुवात होत आहे. सन २०२५-२६ या वर्षांसाठी दुर्बल वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित (अल्पसंख्याक शाळा वगळून )शाळांमधील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुलांना इयत्ता आठवी पर्यंत मोफत शिक्षण असेल.

बृहन्मुंबई परीक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळासाठी २५५ शाळांमध्ये ४ हजार ६८५ जागा आहेत, आणि इतर मंडळांसाठी ७२ शाळांमध्ये १ हजार ३६८ जागा आहेत. अशा एकूण ३२७ शाळांमधे ६ हजार ५३ जागा आहेत. या प्रक्रियेतंर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी दिनांक १४ जानेवारी २०२५ ते दिनांक २७ जानेवारी २०२५ या कालावधीपर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक  वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता इच्छुक पालकांनी या कालावधीत आपल्या पाल्यांचे अर्ज भरावेत, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. 

पालकांनी अर्ज भरतांना विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. तसेच ज्या बालकांच्या प्रवेशासाठी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकासाठी पुन्हा अर्ज करता येणार नाही. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन सोडत काढण्याकरिता दिनांक निश्चित केला जाणार आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.