'मला फ्राईड चिकन खावेसे वाटतेय'; गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील मुलाचा भावूक संदेश

फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकांनी पालकांची माफी मागितली आहे.

Updated: Jul 7, 2018, 02:28 PM IST
'मला फ्राईड चिकन खावेसे वाटतेय'; गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील मुलाचा भावूक संदेश title=

चियांग राय(थायलंड): गेल्या दोन आठवड्यांपासून थायलंडमधील गुहेत अडकलेल्या फुटबॉल संघातील मुलांनी लिहलेले पत्र मदत यंत्रणांच्या हाती लागले आहेत. थायलंडच्या नेव्ही सीलच्या फेसबुक पेजवर हे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रातील भावूक संदेश अक्षरश: काळीज हेलावून टाकणारे आहेत. सुदैवाने एवढ्या कठीण परिस्थितीमध्येही मुलांनी हिंम्मत कायम राखली आहे. पत्रामध्ये एका मुलाने आपल्या आई-वडिलांना उद्देशून लिहले आहे की, आई आणि बाबा, माझी काळजी करु नका. मी सुखरुप आहे. इथून बाहेर पडल्यानंतर मला फ्राईड चिकन खायला घेऊन जा. मी तुमच्यावर प्रेम करतो. तर दुसऱ्या एका संदेशात मुलाने म्हटले आहे की, आई-बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला पोर्क शॅबू खावेसे वाटत आहे.

तर दुसरीकडे फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकांनी पालकांची माफी मागितली आहे. ‘सर्व मुले सुखरुप आहेत, मी त्यांची काळजी घेईनच. पण सर्व पालकांची मी माफी मागतो’, असे पत्र प्रशिक्षकांनी लिहीले आहे. थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर जवळपास नऊ दिवसांनी शोध लागला. थाय फुटबॉल संघातील ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुले आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले आहेत. या मुलांच्या सुटकेसाठी जगभरातून प्रार्थना होत असून स्थानिक आपातकालीन यंत्रणा आणि नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत. या मुलांच्या मदतीसाठी गेलेल्या सिल कमांडोचा शुक्रवारी मृत्यू झाला होता. शनिवारी खराब हवामानामुळे बचाव मोहीम थांबवण्यात आली आहे.