जगभरातील श्रीमंतांचं महाबळेश्वर; फक्त अब्जाधीशांनाच परवडतो इथं येण्याचा खर्च, कुठंय हे ठिकाण?

Costliest Vacation Destinations Switzerland: सुट्टीच्या निमित्तानं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळतात. पण, त्यातही काही ठिकाणांना मात्र अनेकांचीच पसंती असते...   

सायली पाटील | Updated: Jan 1, 2025, 02:37 PM IST
जगभरातील श्रीमंतांचं महाबळेश्वर; फक्त अब्जाधीशांनाच परवडतो इथं येण्याचा खर्च, कुठंय हे ठिकाण?  title=
Costliest Vacation Destinations Switzerland travel news

Costliest Vacation Destinations Switzerland: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, जिथं भटकंतीसाठी एकदातरी जायलाच हवं. अनेकांच्याच बकेटलिस्टमध्ये असं एकतरी ठिकाण असेल, अशाच एका ठिकाणाची माहिती आज पाहणार आहोत. इथं महाराष्ट्रात ज्याप्रमाणं थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांचेच पाय महाबळेश्वर या गिरीस्थानाकडे वळतात तिथेच जगात एक ठिकाण असंही आहे जे खऱ्या अर्थाने श्रीमंतांचं महाबळेश्वर (Mahabaleshwar) आहे असं म्हणायला हरकत नाही. 

इथं पर्वतरांगा आहेत, हिमशिखरं आहेत, टुमदार खेडी आहेत, बर्फाच्छादित डोंगरही आहेत. श्रीमंतांचाच अधिक वावर असणारं हे ठिकाण म्हणजे स्वित्झर्लंडमधील गस्टाड हे गाव. अनेक अब्जाधीश आणि धनाढ्य मंडळी इथं सुट्ट्यांसाठी येतात असं म्हटलं जातं. सामान्यांच्या पगारामध्ये तर इथल्या प्रवासाचा विचारही न परवडणाराच आहे असं म्हणणं गैर नाही. सेलिब्रिटी मंडळींकडूनही या ठिकाणाला नेहमीच पसंती दिली जाते. 

निसर्गानं मुक्तहस्तानं उधळण केलेल्या या गावामध्ये तेथील स्थानिकांनीसुद्धा आपलं भरीव योगदान दिलं आहे. पर्यटनामुळं या गावाला विशेष दर्जा मिळाला असून, इथं येणाऱ्या नावाजलेल्या मंडळींमुळं त्याला खऱ्या अर्थानं ग्लॅमरही मिळालं आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

गस्टाडचं मुख्य आकर्षण काय? 

गस्टाड हे एक विंटर वंडरलँड म्हणून जगभरात लोकप्रिय आहे. स्किईंग आणि आलिशान जीवनशैलीमुळं जगाच्या नकाशावर या गावाला खास स्थान आहे. एकाहून एक सरस लक्झरी हॉटेल, कमाल खाद्यसंस्कृती आणि मोठाल्या खेळाच्या मैदानांसह इथं अनेक मुलभूत आणि अद्ययावत सुविधाही आहेत. गस्टाडला जाणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये करीना- सैफ, अनुष्का- विराट, लिओनार्दो दी कॅप्रिओ, पॅरिस हिल्टन यांसारख्या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. 

हेसुद्धा वाचा : New Year ला रणबीर- आलियाची रोमँटिक मिठी... ; अभिनेत्याच्या आईनच शेअर केला Video 

हाय एंड ब्रँड आणि येथील सुखसोईंमुळं जगभरातील नावाजलेल्या व्यक्तींसाठीही हे ठिकाण आकर्षणाचा मुद्दा ठरतं. क्रॉस-कंट्री स्की ट्रेल्स, विंटर हायकिंग ट्रेल्स, टोबोगनिंग, डे स्पा अशा मोठ्या खर्चिक सुविधा आणि अॅडवेंचर स्पोर्ट्सची मजा इथं घेता येते. गस्टाड पॅलेस हे इथं असणारं सर्वात आलिशान आणि महागडं हॉटेल. इथूनच स्विस अॅल्प्सचं मनमोहक दृश्यही सहजगत्या पाहता येतं. 

गस्टाड फक्त पर्यटनासाठीच नव्हे, तर येथील शैक्षणिक सुविधांसाठीही प्रसिद्ध आहे. इथं असणारं स्विस बोर्डिंग स्कूल जगभरात प्रसिद्ध असून, बिझनेस इनसाइडरनं काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इथं वर्षाचा खर्च  108,900 स्विस फ्रँक म्हणजेच साधारण 1 कोटी रुपये इतका असल्याचं सांगितलं जातं.