मुंबई : कोरोना पुन्हा एकदा चीनच्या वुहानमध्ये परतला आहे. 10 लाख लोकसंख्या असलेल्या जिआंग्झिया जिल्ह्यात शटडाऊन करण्यात आले. चीनमधील वुहान हे तेच शहर आहे जिथे जगात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर तो जगभर पसरला. येथील बार, सिनेमा हॉल आणि कॅफे सर्व बंद करण्यात आले आहेत.
जिआंग्झियामध्ये कोरोनाचे चार रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, जिआंग्झियाच्या शहरी भागात तीन दिवसांपासून "तात्पुरते नियंत्रण उपाय" लागू करण्यात आले आहेत.
कोरोनाची प्रकरणे पाहता प्रशासनाने बार, सिनेमागृह आणि इंटरनेट कॅफे बंद केले आहेत. याशिवाय बाजारपेठ, रेस्टॉरंट्सही बंद करण्यात आली आहेत. यासोबतच मोठ्या कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच शैक्षणिक संस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बसेसपासून सर्व सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. लोकांना अत्यावश्यक असल्याशिवाय शहर सोडू नका असा सल्ला देण्यात आला आहे. अधिका-यांनी चार उच्च-जोखीम क्षेत्रे देखील ओळखली आहेत जिथे रहिवाशांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
2020 च्या सुरुवातीस चीनमधील वुहान येथे जगातील पहिले लॉकडाउन लागू करण्यात आले. या अंतर्गत दोन महिने लोक घराबाहेर पडू शकले नाहीत.