Spy Ship In Indian Ocean: भारतीय सागरी सीमांचं संरक्षण करण्यासाठी नौदलाकडून या भागावर करडी नजर ठेवली जाते. भारतीय नौदलासह तटरक्षक दलाकडूनही सागरी सुरक्षिततेसंदर्भात प्रचंड काळजी घेतली जात असतानाच देशातील संरक्षक तत्त्वांबाबत चिंता वाढवणारी बाब नुकतीच समोर आली आहे. ज्यानुसार भारतीय सागरी हद्दीअंतर्गत काही संशयास्पद हालचाली पाहण्यात आल्या आहेत. (Chinese Spy Ship In Indian Ocean)
प्राथमिक माहितीनुसार दक्षिण चीनच्या सागरी हद्दीमध्ये लष्कर तैनात केल्यानंतर आता चीनकडून तीन निरीक्षण आणि हेरगिरी करणारी जहाजं हिंदी महासागरात तैनात करण्यात आली आहेत. चीनची जियांग यांग होंग 01 ही सर्वाधिक वापरातील गस्त नौका बंगालच्या खाडी भागात अंदमान बेट समुहांपासून 600 मैल पश्चिमेस तैनात ठेवण्यात आलं आहे.
एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाच्या माहितीनुसार, चीनचं जियांग यांग होंग 01 हे जहाज पाण्याच्या पृष्टाखाली राहून तेथील हालचालींवर नजर ठेवत आहे. 12 किमी अंतर खोल राहून जवळपास तीन महिने सागरी तळाचा आराखडा काढून भविष्यात पाणबुड्यांसंदर्भातील गरजेची माहिती गोळा करण्याचं काम ही गस्तनौका करते. प्राथमिक माहितीनुसार चीनच्या एक्सवायएच 01 नं 7 - 8 मार्च रोजी बंगालच्या खाडी परिसरात प्रवेश केला असून अद्यापही ही नौका तिथंच तैनात आहे.
चीनचं दा यांग हाओ मॉ हे जहाज मॉरिशस येथील पोर्ट लुईस इथं 1200 सागरी मैल दक्षिणेला असून एक निरीक्षण नौका जियांग यांग होंग 03 मालदीवच्या सागरी हद्दीत दिसत आहे. समुद्री अवलोकन आणि हायड्रोग्राफिक सर्वेक्षणासाठी मानवविरहित कार्यप्रणाली नियोजित करण्याचं काम हे जहाज करत आहे. सध्याच्या घडीला भारतीय नौदलाकडूनही चीनच्या या तिनही जहाजांवर करडी नजर छेवण्यात येत आहे. चीनच्या खुरापती नेमक्या कोणत्या दिशेला जात आहेत आणि त्याचा भारतावर नेमका कसा परिणाम होणार यासंदर्भातील माहिती मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संरक्षण यंत्रणा करत आहे.