मुंबई : अफगाणिस्तानवर पुर्णपणे कब्जा केल्यानंतर तालिबान बंडखोरांनी रविवारी मध्यरात्री सरकार स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तालिबान बंडखोरांच्या या घोषणेनंतर जगातील सर्वच देश सतर्क झाले आहेत. तालिबान लढाऊंनी राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलं आहे. तर याच दरम्यान या परिस्थितीनंतर भारत सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानमधील बिकट परिस्थिती पाहता दिल्लीतील अफगाणिस्तान दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे शिकागोहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या एआय AI126 या विमानाने मजार-ए-शरीफवर अफगाणच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर काही वेळातच अचानक यू-टर्न घेतला. हे विमान सध्या तुर्कमेनिस्तानच्या हवाई हद्दीत आहे. याचं कारण अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही, परंतु अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रावरील सुरक्षेच्या चिंतेने भारतीय विमानांना वळवण्यास भाग पाडल्याचा अंदाज लावला जातोय.
अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारताचे सर्व स्तरावरून प्रयत्न सुरु आहेत. मात्र आता परिस्थितीनुसार, काबूल आणि दिल्ली दरम्यान सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाची काही उड्डाणं भारताच्या वतीने आरक्षित करण्यात आली होती, जेणेकरून भारतीय नागरिकांना बाहेर काढता येईल.
कॅबिनेट सचिवांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नवी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठकही होणार आहे. परराष्ट्र मंत्रालय, नागरी उड्डयन मंत्रालयाचे अधिकारीही यात हजर असतात. अफगाणिस्तानातून भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मंथन होऊ शकतं.
दरम्यान अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबान बंडखोरांच्या प्रवेशानंतर हजारो लोकांची गर्दी काबूल विमानतळावर दिसत आहेत. अनेक देशांमधील राजकारणी व्यक्तींना काबूल विमानतळावरून सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय. अशातच विमानतळावर गोळीबार झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे विमानतळावर लोकांची पळापळ सुरू होती. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय.