भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाची फॅन्स वाट पाहत आहेत. भारताचा हा वेगवान गोलंदाज सध्या दुखापतीतून बरा होत आहे. शमीने टीम इंडियाकडून शेवटचा सामना 19 नोव्हेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला होता. वनडे वर्ल्ड कपनंतर शमीची सर्जरी करण्यात आली होती, ज्यामधून तो पूर्णपणे बरा न झाल्याने क्रिकेटच्या मैदानात अद्याप पुनरागमन करू शकला नाही. मात्र आता मीडिया रिपोर्ट्समधून शमीचे पुनरागमन कधी होणार याविषयी माहिती समोर येत आहे.
पीटीआयने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद शमी हा ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टेस्ट सिरीजपूर्वी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालच्या टीमकडून मैदानात उतरेल. रणजी ट्रॉफीची सुरुवात 11 ऑक्टोबर पासून होईल. 11 ऑक्टोबर रोजी बंगाल विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात सामना खेळवला जाईल, ज्यात मोहम्मद शमी खेळताना दिसू शकतो. रणजी ट्रॉफीचा सामना खेळल्यावर शमी हा 19 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळायला उतरेल. तो न्यूझीलंड विरुद्धच्या कोणत्याही एका टेस्ट सामन्यात खेळताना दिसू शकतो.
नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्या म्हणण्यानुसार या सीरिजमध्ये मोहम्मद शमीचे खेळणे जवळपास नक्की आहे. टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना जय शाह म्हणाले, "आमची टीम पहिल्यापासूनच चांगली तयार आहे. आम्ही काही वेळासाठी जसप्रीत बुमराहला आराम दिला. शमी सुद्धा लवकरच फिट होईल अशी आशा आहे. आता आपल्याकडे एक अनुभवी भारतीय टीम आहे. तसेच रोहित आणि विराट सारखे सिनियर खेळाडू सुद्धा फिट आहेत. जय शाह यांनी पुढे म्हंटले की, "शमीबाबतचा प्रश्न योग्यच आहे. तो तिथे असेलच कारण तो एक अनुभवी खेळाडू आहे आणि ऑस्ट्रेलियामध्ये त्याची आम्हाला गरज आहे".
मोहम्मद शमी हा भारताच्या दिग्गज गोलंदाजांपैकी एक असून त्याच्याकडे क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. भारताकडून शमीने आतापर्यंत 64 टेस्ट, 101 वनडे आणि 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळेल आहेत. याशिवाय वनडेमध्ये शमीने तब्बल १९५ तर टी २० मध्ये २४ विकेट्स घेतले आहेत.