Jasprit Bumrah: आगामी T20 World Cup पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा हुकूमी एक्का मानला जाणारा जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला. बुमराहच्या जागी आता मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संघात सामिल करण्यात आलंय. मात्र, बुमराहसारखी कमाल सिराजला करता येईल का?, हा देखील मोठा प्रश्न आहे. अशातच आता बुमराहला पुरेशी विश्रांती न दिल्याने सिलेक्टर्सवर टीका होताना दिसते.
भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफरने (Wasim Jaffer) बुमराहला संघात स्थान दिल्याने मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. टीम इंडियाने (Team India) बुमराहला संघात घेण्यासाठी घाई केली, असं वसीम जाफर यांचं म्हणणं आहे.
स्ट्रेस फ्रॅक्चर आधीच झाले असावे, तेवढे नाही पण दोन सामने खेळल्यानंतर दबावामुळे स्ट्रेस फ्रॅक्चर आणखी बिघडले असावे. त्याला सामना खेळण्याची घाई झाली, असं जाफर म्हणाला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध बुमराहला संघात स्थान देण्याऐवजी त्याला थेट टी-ट्वेंटी विश्वचषकात खेळवलं असतं तर बुमराह तोपर्यंत फिट झाला असता, असंही जाफर म्हणाला.
बुमराहची दुखापत किती गंभीर आहे, याबद्दल मला माहिती नाही. पण मला वाटतं की त्याला आणखी थोडा वेळ मिळायला पाहिजे होता, असंही वसीम जाफर म्हणाला आहे. बुमराहच्या जागी आता मोहम्मद सिराजला वर्ल्ड कपमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या मैदानावर भारतीय गोलंदाजी किती प्रभाव ठरणार हे देखील पहावं लागणार आहे.