Virender Sehwag On Shoaib Akhtar: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी काळजाचा विषय. भारतीय असो वा पाकिस्तानी सर्वजण या दोन्ही संघासाठीत सामना पाहण्यासाठी उत्सुक असतात. 2008 पासून भारत पाकिस्तान यांच्यात सिरीज खेळवली जात नाही. जे काही सामने होतील ते आयसीसीच्या (ICC) स्पर्धेत होतात. इंडिया पाकिस्तान म्हटलं की वादविवाद आलाच. त्यात सर्वात खास ठरतो तो रावळपिंडी एक्सप्रेस (Rawalpindi Express) म्हणजेच शोएब अख्तर. शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
दोन्ही खेळाडूंनी आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही दोन्ही खेळाडू एकमेकांबद्दल काही ना काही विधाने करत असतात. एकमेकांना टोले लगावण्याची संधी सोडत नाहीत. तसेच ऐकमेकांचं कौतूक देखील करतात. मागे एकदा शोएब अख्तरने विरेंद्र सेहवागच्या केसांबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर आता विरूने रोखठोक (Virender Sehwag On Shoaib Akhtar) उत्तर दिलंय.
सेहवागच्या डोक्यावर असलेल्या केसांच्या संख्येपेक्षा माझ्याकडे जास्त नोट्स आहे, असं म्हणत अख्तरने सेहवागचे पाय खेचले होते. त्यावर आता प्रसिद्ध अशा ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या यूट्यूब शोमध्ये सेहवागने उत्तर दिलंय. आता माझे केस त्याच्या नोटांपेक्षा जास्त आहेत, असं म्हणत सेहवागने प्रत्युत्तर दिलंय. जेथं प्रेम असतं, तिथं मस्तीही असते. 2003 - 2004 मध्ये शोएब अख्तरशी माझी घट्ट मैत्री झाली होती. आम्ही चांगले मित्र आहोत आणि आम्ही नेहमी एकमेकांचे पाय खेचतो, असं सेहवाग म्हणाला आहे.
दरम्यान, यावेळी विरेंद्र सेहवागने पाकिस्तानचा माजी फलंदाज इंझमाम उल हक याच्यावर देखील भाष्य केलं. मी इंझमाम उल हक (Inzamam ul Haq) याला आशियातील मधल्या फळीचा सर्वोत्तम फलंदाज मानतो, असं विरेंद्र सेहवाग म्हणाला आहे. इंजी भाई खूप चांगला खेळाडू होता. 2003 साली 10 ओव्हरमध्ये 80 धावा करणं अवघड मानलं जात होतं. त्यावेळी इंजी भाई आरामात चेस करायचा. आशियामध्ये मी इंझमामपेक्षा चांगला फलंदाज पाहिला नाही, असंही सेहवाग यावेळी म्हणाला आहे.