BCCI Sends Warning To Indian Team Support Staff: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाच्या सुमार कामगिरीमुळं आता सर्वत स्तरांतून खेळाडूंवर सडकून टीका होताना दिस आहे. ऑस्ट्रेलियानं दाखवलेल्या प्रभावी खेळापुढं भारतीय संघाला गटांगळ्या खाताना सर्वांनीच पाहिलं. इतकंच नव्हे, तर या अतीव महत्त्वाच्या स्पर्धेत संघाची नेमकी पडझड कशी झाली, कोणत्या खेळाडूनं मैदानात नेमकं कसं प्रदर्शन केलं हे सारंकाही क्रिकेटप्रेमी आणि तिथं निवड समितीनंही पाहिलं. थोडक्यात सांगावं तर आता संघाच्या पराभवाचं खापर कर्णधार रोहित शर्मा आणि संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी असणाऱ्या राहुल द्रविडवर फोडलं जात आहे.
सध्याच्या घडीला संघानं एक मोठी स्पर्धा गमावली असली तरीही आता किमान यंदाच्या वर्षात तरी त्यांची कामगिरी सुधारे अशा आशा अनेकांनीच बाळगल्या आहेत. काही दिवसांनीच संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. जिथं टी 20 चे पाच सामने, 3 एकदिवसीय सामने आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
तुलनेनं मोठ्या दौऱ्यामध्ये संघातून काही खेळाडूंना आराम दिला जाऊ शकतो. इतकंच नव्हे तर प्रशिक्षकपदी असणाऱ्या राहुल द्रविडलाही या प्रसंगी आराम दिला जाऊ शकतो. एकदिवसीय आणि टी20 सामन्यासाठी द्रविडला आराम दिला गेला तरीही तो कसोटी सामन्यासाठी मात्र संघाला प्रशिक्षण देण्यासाठी जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. द्रविडच्या अनुपस्थितीत एकदिवसीय आणि टी 20 सामन्यांसाठी व्हीव्हीएस लक्ष्मण हा संघाच्या प्रशिक्षकपदी असेल.
WTC मध्ये झालेल्या पराभवानंतर आता बीसीसीआयकडून फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्र्बे यांच्या नियुक्तीबाबतही चर्चा होणार असल्याचं म्हटलं जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचणं ही लहान बाब नसून, परदेश दौऱ्यात संघानं अपेक्षित कामगिरी केली नसल्याचं मत बीसीसीआयनं स्पष्टपणे मांडलं. इतकंच नव्हे, तर भविष्यातील स्पर्धा लक्षात घेता संघाच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा होणंही तितकंच महत्त्वाचं ठरत आहे.
इथे वेस्ट इंडिजनंतर संघ आयर्लंडसोबत टी20 मालिका खेळणार असून, सप्टेंबरमध्ये आशिया चषकासाठी सज्ज होणार आहे. तर, ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये विश्वचषक खेळताना दिसणार आहे. संघाचं येत्या काही महिन्यांसाठीचं वेळापत्रक ठरलं असलं तरीही आता प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच असेल की आणखी कोणी? या प्रश्नाचं उत्तर इतक्यात देणं शक्य नाहीये.