भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..'

Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 6, 2025, 02:17 PM IST
भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..' title=
सामन्यानंतर घडला हा प्रकार

Sunil Gavaskar Shocked: ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित करण्यात आलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेचा निकाल रविवारी लागला. यजमान ऑस्ट्रेलियाने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-1 ने विजय मिळवला. मात्र या विजयानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतलेल्या एका निर्णयामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. सिडीनच्या क्रिकेट मैदानात पार पडलेल्या अखेरच्या कसोटीनंतर झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळा पाहून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांना मोठा धक्का बसल्याचं त्यांनीच म्हटलं आहे. विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अॅलन बॉर्डर यांनी चषक सोपवताना गावसकरांना यासाठी आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. गावसकर हे मैदानामध्ये बॉण्ड्री लाइनजवळ एकटेच उभे होते. विशेष म्हणजे ही मालिका ज्या दोन क्रिकेटपटूंच्या नावाने भरवली जाते त्यापैकी एकाला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने अशाप्रकारची वागणूक दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

10 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा विजय

पर्थमधील महिला कसोटी सामना भारताने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत उरलेल्या चारपैकी एक अनिर्णित राहिलेली कसोटी वगळता तिन्ही कसोटी सामने जिंकले. अॅडलेडमधील कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. त्यानंतर ब्रिस्बेन कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिली. मेलबर्न आणि सिडनीमधील विजयामुळे कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने तब्बल 10 वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला हा चषक मिळवून दिला. 

नेमकं काय ठरलेलं?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा चषक देण्यासाठी एक विचित्र नियम केला होता. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली तर बॉर्डर चषक ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती देतील असं ठरलं. तर भारताने मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवल्यास सुनिल गावसकर सिडनी कसोटीचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या हाती देणार असं ठरलेलं. मात्र हा निर्णय गावसकर यांना कळवण्यात आला नव्हतं असं त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. बॉर्डर यांनी एकट्यानेच हा चषक ऑस्ट्रेलियन संघाला दिल्यानंतर गावसकरांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याच नावाने भरवल्या जाणाऱ्या स्पर्धेत माझा अपमान झाल्याची भावना या भारताच्या माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली.

नक्की वाचा >> बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?

गावसकर संतापले

"पारितोषक वितरणासाठी मला स्टेजवर असलेलं आवडलं असतं. ही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी आहे. ही भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान खेळवली जाते. त्यामुळे दोघेही असायला हवे होते," असं गावसकर यांनी 'कोड स्पोर्ट'शी बोलताना सांगितलं. तसेच, "म्हणजे मी इथे मैदानातच आहे. पुरस्कार देताना मालिका ऑस्ट्रेलिया जिंकली की समोरचा संघ हे महत्त्वाचं ठरता कामा नये. ते चांगलं क्रिकेट खेळले म्हणून ते जिंकले. हे ठिक आहे. मात्र मी केवळ भारतीय असल्याने मला पारितोषक वितरण समारंभाला बोलवण्यात आलं नाही. माझा चांगला मित्र असलेल्या अॅलेन बॉर्डरबरोबर ऑस्ट्रेलियन संघाला हा चषक द्यायला मला आवडलं असतं," असं गावसकर म्हणाले आहेत. 

मागील अनेक दशकांपासून खेळवली जातेय ही स्पर्धा

1996-97 पासून भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर चषकस्पर्धा खेळवली जाते. मेलबर्नच्या क्रिकेट मैदानावर मागील 97 वर्षांचा सर्वाधिक प्रेक्षक उपस्थितीचा विक्रम यंदाच्या स्पर्धेतील सामन्याने मोडून काढला. यावरुनच या मालिकेची लोकप्रियता किती आहे हे समजतं.