हार्दिकवरुन टीम इंडियात राडा? रोहित शर्मा- अजित आगरकरने फेटाळली गंभीरची 'ती' मागणी

Fight Over Team India Rohit, Agarkar Vs Gambhir: प्रशिक्षक गौतम गंभीर विरुद्ध कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती असा संघर्ष दिसून येत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 21, 2025, 08:39 AM IST
हार्दिकवरुन टीम इंडियात राडा? रोहित शर्मा- अजित आगरकरने फेटाळली गंभीरची 'ती' मागणी title=
पडद्यामागील घडामोडींची चर्चा

Fight Over Team India Rohit, Agarkar Vs Gambhir: भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. विशेष म्हणजे या वादामध्ये कर्णधार रोहित शर्मा हा अजित आगरकरच्या बाजूने आहे. रोहित शर्माने यापूर्वीच गंभीरबरोबर आफला काहीही वाद नसल्याचं अनेकदा स्पष्ट केलं असलं तरी पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा संघ निवडताना प्रशिक्षक गंभीरचे सल्ले डावलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

नक्की घडलं काय?

रोहित शर्मा आणि अजित आगरकर या दोघांकडून 18 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता इंग्लंड दौरा आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा होणं अपेक्षित होतं. मात्र ही घोषणा करण्यासाठी तब्बल 3 तास उशीर झाला. 'दैनिक जागरण'ने दिलेल्या वृत्तानुसार, गौतम गंभीरने रोहित शर्मा आणि अजित आगरकरने निवडलेल्या संघाला विरोध केला. यामुळेच तीन तास उशीरा संघ जाहीर झाला. मागील काही महिन्यांपासून सातत्याने डावलण्यात येत असलेल्या हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपद देण्यासाठी गंभीर आग्रही होता. मात्र याला रोहित आणि आगरकरचा विरोध होता. रोहित आणि आगरकरने शुभमन गीलला उपकर्णधार केलं जावं असं मत नोंदवत त्यावर दोघेही शेवटपर्यंत ठाम राहिले. 

या मुद्द्यावरुनही मतभेद अन् गंभीरला डावलण्यात आलं

केवळ हार्दिकच नाही तर गंभीरची अन्य एक मागणीही फेटाळण्यात आली आहे. ऋषभ पंत आणि संजू सॅमसनच्या निवडीवरूनही मतभेद झाले. पंतला प्राधान्य देण्यात आलं असलं तरी गंभीरने संजू सॅमसनला प्राधान्य दिलं होतं. संजूची टी-20 मधील कामगिरी उत्तम असल्याचं गंभीरचं म्हणणं होतं. मात्र कर्णधार आणि निवड समितीने पंतच्या पारड्यात मत टाकलं. संजूला निवडण्याची गंभीरची विनंती मान्य करण्यात आली नाही.

भारतासाठी धोक्याची घंटा

हे वृत्त खरं असेल तर भारतीय संघाच्या भविष्याच्या दृष्टीने ही चांगली घटना नाही. खरोखरच गंभीरचा एकही सल्ला मान्य करण्यात आला नसेल तर त्याला डावलून निर्णय घेतल्यासारखं झाल्याने संघासंदर्भातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर आला आहे. याचा परिणाम मालिकेवरही होऊ शकतो. इंग्लंडविरुद्ध भारत पाच टी-20 सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ खालीलप्रमाणे:

रोहित शर्मा (कर्णधार) , शुभमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षत पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा