IPL 2025 Retention List: आयपीएल 2025 साठी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या रिटेनशन यादीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. 10 संघांनी 46 खेळाडूंना कायम ठेवले. एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांचे काय होणार याकडे सगळ्याच्या नजरा होत्या. अखेरीस पुन्हा एकदा त्या दोन्ही खेळाडूंना कायम ठेवण्यात आले आहे. एमएस धोनी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) सह आणि रोहित शर्मा मुंबई इंडियन्स (MI) सह त्यांचा प्रवास सुरू ठेवतील. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने 'अनकॅप्ड प्लेयर' नियम वापरून एमएस धोनीला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये विराट कोहली, मुंबई इंडियन्समध्ये जसप्रीत बुमराह यांनाही कायम ठेवण्यात आलं आहे. परंतु आयपीएल 2025 साठी विविध संघांचे 5 कर्णधारांना कर्णधारपद सोडावे लागले आहे. या कर्णधारांवर एक नजर टाकूयात
IPL 2025 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने फाफ डू प्लेसिस या खेळाडूला रिलीज केले आहे. फाफ डू प्लेसिसने आयपीएल 2022 ते आयपीएल 2024 पर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे कर्णधारपदी काम केले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2025 साठी फक्त तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. या तीन खेळाडूंमध्ये विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी), यश दयाल (5 कोटी) यांचा समावेश आहे. यंदा विराट कोहली पुन्हा एकदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे.
तब्ब्ल 9 वर्षांनंतर ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्ससोबतचा प्रवास संपवला आहे. स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने नेतृत्त्व करताना दिसणार नाही. दिल्ली कॅपिटल्सचे मालक आणि सह-मालक GMR आणि JSW यांना प्रत्येकी दोन वर्षांसाठी व्यवस्थापन नियंत्रण मिळते. त्यामुळे JSW ने निवडलेला ऋषभ पंत हा GMR ची पहिली पसंती नाही. GMR च्या व्यवस्थापनाखाली आल्यानंतर, त्यांनी माजी प्रशिक्षक व्यवस्थापन काढून टाकले ज्यात क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांचा समावेश होता, त्यांच्या जागी वेणुगोपाल राव यांना नियुक्त केले गेले. आता ऋषभ पंतला बाहेरचा रास्ता दाखवण्यात आला आहे. ऋषभच्या जागी श्रेयस अय्यरला दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजवर एकदाही आयपीएलची ट्रॉफी न जिंकणाऱ्या पंजाब किंग्जचे नेतृत्व शिखर धवनने 2022 ते 2024 पर्यंत केले. गेल्या तीन सिजनमध्ये पंजाब किंग्जचे कर्णधार असलेल्या शिखर धवनने निवृत्ती घेतली आहे. पंजाब किंग्जला यंदा नवा कर्णधार मिळणार आहे. पंजाब किंग्सने केवळ 9.5 कोटी रुपये खर्च केले आहे. सलग दहा वर्षे प्लेऑफमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या पंजाब किंग्जने केवळ सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि फिनिशर शशांक सिंग यांना कायम ठेवले आहे.
यंदाच्या सीजनपूर्वी केएल राहुल आणि लखनऊ सुपर जायंट्स वेगळे झाले आहेत. आयपीएल 2024 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर, तत्कालीन कर्णधार केएल राहुल आणि एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांच्यात मैदानावर तणावपूर्ण चर्चा झाली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊ सुपर जायंट्स संघ केएल राहुलला चांगली किंमत देण्यास तयार होता. तथापि, केएल राहुलने वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमुळे लखनौ सुपर जायंट्सपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आयपीएल 2025 पूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाने श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली, कोलकाता नाइट रायडर्स संघाने 10 वर्षांचा दुष्काळ संपवून आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले होते. मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरची संघ व्यवस्थापनाशी चर्चा अयशस्वी ठरली. श्रेयस अय्यरला कदाचित असे वाटले असेल की केकेआरला आयपीएलचे जेतेपद मिळवून दिल्यानंतर त्याची किंमत सध्याच्या 12.25 कोटी रुपयांपेक्षा जास्त असावी, परंतु भारतीय टी-20 संघात त्याचे स्थान निश्चित न झाल्याने आणि त्याच्या खराब स्ट्राइक रेटमुळे केकेआर त्याच्यावर खर्च करायला तयार नाही. श्रेयस यंदा दिल्लीचा कर्णधार होऊ शकतो अशी चर्चा आहे.