'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 14, 2025, 07:23 PM IST
'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत title=

भारतीय क्रिकेट संघ मागील काही काळापासून सातत्याने खराब कामगिरी करत असल्याने टीकेचा धनी ठरला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यावर जोरदार टीका होत आहे. दुसरीकडे भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरलाही लक्ष्य केलं जात आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील पराभवानंतर गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही टांगती तलवार आहे. दरम्यान चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी असेल त्यावर गौतम गंभीरबाबत मूल्यांकन केलं जाईल. तसंच संघात दीर्घकाळापासून चालत आलेली 'सुपरस्टार संस्कृती' संपवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमुळे ड्रेसिंग रूममध्ये असंतोष निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये गौतम गंभीरने पदभार स्वीकारल्यापासून, भारतीय संघाने 10 पैकी सहा कसोटी सामने आणि श्रीलंकेत द्विपक्षीय एकदिवसीय मालिका गमावली आहे.

भारतीय संघाच्या कामगिरीमुळे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय करिअरवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यातच त्यांच्या खराब फॉर्मने या चर्चेत भर घातली आहे. गंभीरची स्थितीही थोडी डळमळीत झाली आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेदरम्यान भारताने 1-3 असा पराभव पत्करला तेव्हा त्याच्या प्रमुख खेळाडूंशी झालेल्या मतभेदामुळे या नाट्यमय घडामोडीत भर पडली आहे. 

"जर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली नाही, तर मुख्य प्रशिक्षकाचे पद अस्थिर होऊ शकते. करार 2027 च्या विश्वचषकापर्यंतचा असला, तरी मूल्यांकनाची प्रक्रिया सुरूच आहे. स्पोर्ट्समध्ये निकाल महत्त्वाचा असतो आणि गंभीरने आतापर्यंत कोणताही ठोस निकाल दिलेला नाही," असं बीसीसीआय सूत्राने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं. 

ऑस्ट्रेलियातील संघाच्या कामगिरीचा बीसीसीआयने आधीच आढावा घेतला आहे. दरम्यान संघ संस्कृतीच्या मुद्द्यावर गंभीर आणि वरिष्ठ खेळाडूंचं एकमत नसल्याचं समजत आहे. "गंभीर गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित असलेली सुपरस्टार संस्कृती संपवू इच्छितो. 2012 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार असताना, त्याने चेन्नई सुपरकिंग्जविरुद्धच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी ब्रेंडन मॅक्युलमला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं होतं. तो येथे सुपरस्टार संस्कृती संपवण्यासाठी आला आहे. ज्यामुळे काही खेळाडूंमध्ये अस्वस्थता आहे," असं सूत्राने सांगितलं आहे. 

गंभीरची मानसिकता स्पष्ट करण्यासाठी त्याने दिल्लीतील त्याच्या खेळण्याच्या दिवसातील आणखी एक उदाहरण दिले. "एकदा, दिल्ली रणजी संघाचा कर्णधार असताना, गंभीरने दिल्ली वायव्येकडील घरचे सामने रोशनरा मैदानावर खेळवण्याचा निर्णय घेतला जिथे खेळपट्ट्या हिरव्या होत्या. पण एका मोठ्या सुपरस्टारला, जो भारतीय संघातून बाहेर होता, त्याला दक्षिण दिल्लीतील त्याच्या निवासस्थानाजवळ असलेल्या जामिया मिलिया इस्लामिया मैदानावर सामने खेळायचे होते. गंभीरने त्याला नकार दिला. त्याचप्रमाणे, भारतीय संघात, त्याला स्टार संस्कृती वाढू द्यायची नाही," असं त्या व्यक्तीने पुढे म्हटलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान काही स्टार खेळाडूंनी हॉटेल्स आणि सरावाच्या वेळेबाबत ज्या विशिष्ट मागण्या केल्या त्यावर मुख्य प्रशिक्षक नाराज असल्याचे समजत आहे. परंतु, दुसरीकडे, वरिष्ठ खेळाडूंना त्यांच्याकडून संवादाचा अभाव जाणवला आहे.