मुंबई : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीगची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते. स्टेडियम असो, टीव्ही असो किंवा मोबाईल...जिथे शक्य आहे तिथे फॅन्स सामना पाहण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बीसीसीआयचाही मोठा फायदा होतो. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांनी बीसीसीआयला मोठा धक्का दिला आहे.
आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये 8 एप्रिलपर्यंत 16 सामने खेळले गेले आहेत. 26 मार्च पासून आयपीएलला सुरुवात झाली. आयपीएल सुरु झाल्याच्या पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंगमध्ये 33 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे. बीसीसीआयला लवकरच 2023-27 सिझनपर्यंतचे मीडिया राईट्स विकायचे आहेत. अशा परिस्थितीत बीसीसआयला हा मोठा फटका असू शकतो.
BARC ने 26 मार्च ते एक एप्रिलपर्यंचा डेटा जाहीर केला आहे. या काळात आयपीएल 2022 चे 8 सामने खेळून झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 8 सामन्यांमध्ये टीव्ही रेटिंग 2.52 इतकं होतं. गेल्या सिझनसी याची तुलना केली तर 2021 मध्ये पहिल्या आठड्यात हे रेटिंग 3.75 होतं. तर 2020 मध्ये पहिल्या आठवड्यातील टीव्ही रेटिंग 3.85 इतकं असल्याची नोंद आहे.
केवळ टीव्ही रेटिंग नाही तर प्रेक्षकांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे. यावेळी पहिल्या आठवड्यात 14% कमी म्हणजेच 229.06 दशलक्ष लोकांनी (सर्व चॅनेलद्वारे) सामने पाहिले. तर गेल्या वर्षी आयपीएलचे सामने 267.7 दशलक्ष प्रेक्षकांनी सामने पाहिले होते.