मनु भाकरला नव्याने पदकं दिली जाणार, नेमकं काय झालं? IOC म्हणाली 'योग्य पद्धत...'

प्रत्येक ऑलिंपिक पदकाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी तुकड्यांचे वजन 18  ग्रॅम (सुमारे दोन तृतीयांश औंस) असते.  

शिवराज यादव | Updated: Jan 14, 2025, 08:29 PM IST
मनु भाकरला नव्याने पदकं दिली जाणार, नेमकं काय झालं? IOC म्हणाली 'योग्य पद्धत...' title=

भारताची स्टार पिस्तूल नेमबाज मनु भाकरला (Manu Bhaker) पॅरिस ऑलिंपिकमधील (Paris Olympic) तिचे दोन्ही कांस्यपदकं बदलून दिली जाणार आहेत. तंतोतंत तशाच दिसणारी नवी पदकं दिली जाणार आहेत. अनेक खेळाडूंनी त्यांची पदकं खराब झाल्याची तक्रार केली आहे. जगभरातील अनेक खेळाडूंनी त्यांच्या जीर्ण झालेल्या पदकांचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदकांची कमाई करणाऱ्या मनु भाकरच्या पदकांचा रंग उडाला असून, ती मागील अनेक काळापासून तशाच स्थितीत असल्याचं समजत आहे. 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) म्हटलं आहे की, खराब झालेले पदके योग्य पद्धतीने मोनाई डी पॅरिसने (the French state mint)) बदलली जातील आणि मूळ पदकांप्रमाणेच कोरली जातील.

प्रत्येक ऑलिंपिक पदकाच्या मध्यभागी असलेल्या लोखंडी तुकड्यांचे वजन 18 ग्रॅम (सुमारे दोन तृतीयांश औंस) असते. फ्रेंच स्टेट मिंटही एक सरकारी मालकीची कंपनी आहे जी फ्रान्ससाठी नाणी आणि इतर चलन तयार करते.

येत्या काही आठवड्यात सर्व खराब आणि सदोष पदकं बदलली जाणार आहेत. यासाठी पॅरिस ऑलिंपिक आयोजन समिती मोनाई डी पॅरिससोबत जवळून काम करत आहे. पॅरिसमधील 2024 च्या ऑलिंपिक आणि पॅरालिंपिक पदकांमध्ये प्रतिष्ठित आयफेल टॉवरचे तुकडे होते. पॅरिस 2024 साठी 5084 सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके लक्झरी ज्वेलरी आणि घड्याळ कंपनी चौमेटकडून (LVMH समूहाचा भाग) डिझाईन करण्यात आली होती आणि मोनाई डी पॅरिसने तयार केली होती.

मनु भाकर ही स्वातंत्र्योत्तर ऑलिंपिकच्या एकाच आवृत्तीत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय आहे. तिने वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून भारताचे पदक खातं उघडले आणि ऑलिंपिक पदक जिंकणारी ती देशातील पहिली महिला नेमबाज ठरली. त्यानंतर २२ वर्षीय खेळाडूने सरबजोत सिंगसोबत मिळून 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक जिंकलं.