India vs England Test: भारत आणि इंग्लंडमध्ये 7 मार्चपासून पाचव्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. धरमशाला येथे होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. भारताने 5 सामन्यांची ही मालिका 3-1 ने आधीच खिशात घातली असून, या सामन्यात संघात बदल करत नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या सामन्यासाठी भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन मैदानात उतरताच नवा रेकॉर्ड आपल्या नावे करणार आहे. आर अश्विनचा हा 100 वा सामना असणार आहे. पण त्याआधी त्याच्यावर एका माजी क्रिकेटरने संताप व्यक्त केला असून गंभीर आरोप केला आहे.
माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आर अश्विनवर गंभीर आरोप करत खंतही व्यक्त केली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून, आपण 100 वा कसोटी सामना खेळणार असल्याने अभिनंदन करण्यासाठी आर अश्विनला फोन, मेसेज केले असता त्याने साधं उत्तर देण्याची तसदीही घेतली नसल्याचा आरोप केला आहे.
त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "100 व्या कसोटी सामन्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी काही वेळा फोन केला. पण त्याने फोन कट केला. त्याला मेसेजही पाठवले, पण उत्तर आलं नाही. आम्ही माजी क्रिकेटपटूंना हा असा आदर मिळत आहे".
Tried calling him a few times to wish him for his 100th Test. Just cut off my call. Sent him a message, no reply. Thats the respect we former cricketers get
— Laxman Sivaramakrishnan (@LaxmanSivarama1) March 6, 2024
दरम्यान त्यांच्या या पोस्टवर एका युजरने त्यांना त्यांच्या कामगिरीची आठवण करुन दिली. एका युजरने आर अश्विनशी तुलना करत तुम्ही फक्त 26 विकेट्स घेतल्याची आणि आर अश्विनने 507 विकेट्स घेतल्याचं सांगितलं. त्यावर लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी त्यालाही उत्तर दिलं. "तू आयुष्यात काय मिळवलं आहेस? आदर हा नेहमी सुसंस्कृत लोकांकडूनच मिळतो. मी याआधी त्याच्या अॅक्शनमध्ये एक सुधारणा सांगत होतो, टीका करत नव्हतो. जर लोकांना समजत असेल तरच," असं त्यांनी सुनावलं. तसंच तुम्ही माझ्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळलं आहे का? 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने...अशी विचारणाही त्यांनी केली.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी आर अश्विनवर टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी आर अश्विनची परदेशी खेळपट्टीवर विकेट घेण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
“भारतीय फलंदाज फिरकीच्या विरोधात संघर्ष करत आहेत कारण भारतातील खेळपट्ट्या कसोटी सामन्यांमध्ये अश्विनसाठी उपयुक्त आहेत. परदेशातील त्याचा रेकॉर्ड पहा,” असं लक्ष्मण शिवरामकृष्णन म्हणाले होते. त्यांनी आऱ अश्विनला स्वार्थी खेळाडूही म्हटलं होतं.
जर अश्विन 2011 च्या आसपास भारतीय संघाचा कर्णधार असणाऱ्या धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला नसता तर त्याला भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आणखी वाट पाहावी लागली असती असाही दावा त्यांनी केला होता.