Budget 2025: बजेटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत! सेन्सेक्समध्ये मोठी उसळी; खरेदी जोरात

Arthsankalp 2025 Share Market Updates In Marathi: अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी सकाळी व्यवहार सुरु झाल्यानंतर बाजारात काय चित्र दिसलं जाणून घ्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 1, 2025, 11:30 AM IST
Budget 2025: बजेटच्या दिवशी शेअर बाजार तेजीत! सेन्सेक्समध्ये मोठी उसळी; खरेदी जोरात title=
शेअर बाजारामध्ये उसळी (प्रातिनिधिक फोटो)

Arthsankalp 2025 Share Market Updates In Marathi: केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात शेअर बाजारामध्ये दिवसाच्या सुरुवातीलाच सकारात्मक वातावरण दिसून आलं. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर होण्यापूर्वीच शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाल्याचं दिसून आलं. शेअर बाजारामध्ये प्रत्यक्षात व्यवहार सुरु झाल्यानंतर काही वेळातच निफ्टी 23,550 वर पोहोचल्याचं दिसून आलं. मिडकॅप शेअर्सची गुंतवणुकदारांनी जोरदार खरेदी केल्याचं चित्र दिवसाच्या सुरुवातीला दिसून आलं. शेअर बाजारातील तेजी ही अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार अधिक मजबूत झाल्याचे संकेत असल्याचं मानलं जात आहे. अर्थसंकल्पाचे सर्व LIVE UPDATES पाहा येथे क्लिक करुन...

कोणत्या स्तरावर सुरु झाला बाजार?

अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसई सेन्सेक्स 100 हून अधिक अंकांच्या तेजीत उघडला. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 104.68 अंकांनी वर होता. बाजार सुरु झाला तेव्हा तो 77 हजार 605.25 च्या पातळीवर होता. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईमध्ये सुद्धा 16.25 अंकांची उसळी दिसून आली. एनएसई 23 हजार 524.65 च्या पातळीवर सुरु झाला.

कोणत्या कंपन्या जोरात आणि कोणत्या घसरल्या?

'निफ्टी'मध्ये दिवसाच्या सुरुवातीला ट्रेण्डींगमध्ये सन फार्मा, अल्ट्राटेक सिमेंट, अपोलो हॉस्पीटल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, एनटीपीसीचे शेअर्स तेजीत होते. तर दुसरीकडे ओएनजीसी, एसबीआय लाइफ, नेस्ले, हीरो मोटोकॉर्पचे शेअर्समध्ये घसरण दिसून आली. बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांच्या निर्देशांकामध्ये 1 टक्क्यांहून अधिक वाढ धिसून आली. तर दुसरीकडे माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. एमएमजीसी, ऑटो आणि धातू क्षेत्रातील कंपन्या तुलनेनं बऱ्याच स्थिर दिसून आल्या.

या कंपनीचे शेअर्स वाढण्याची शक्यता

शेअर बाजाराचे जाणकार आणि सहकारी वाहिनी 'झी बिझनेस'चे मुख्य संपादक अनिल सिंघवी यांनी नेमके कोणते शेअर खरेदी करावेत याविषयीचं मार्गदर्शन केलं आहे. देशातील सर्वात मोठ्या बॅटरी तयार करणाऱ्या एक्साइड इंडस्ट्रीज (Exide Industries) या कंपनीच्या शेअरना त्यांनी पसंती दिली असून, पुढील एक ते तीन वर्षांसाठीच्या कालावधीत या शेअरमध्ये पैसे गुंतवल्यास याचा सकारात्मक फायदा मिळेल. हा शेअर या स्तरावरून दुपटीपर्यंत जाऊ शकतो. त्याशिवाय प्रत्येक वेळी जेव्हाजेव्हा या शेअरची किंमत 10 टक्के पडेल तेव्हा यामध्ये गुंतवणूक करावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. एक्साइड इंडस्ट्रीजच्या शेअरची किंमत 360 रुपयांच्या जवळपास आहे. 

(शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची असून कृपया नियम व अटी वाचून तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच आर्थिक गुंतवणुकीचा निर्णय घ्या.)