Mumbai Local Train Update: रविवारी तुम्हीदेखील प्रवास करण्याच्या विचारात आहात का? तर 2 फेब्रुवारी रोजी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे घेण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं काही लोकल रद्द करण्यात येतील तर काही लोक उशिराने धावणार आहेत. नागरिकांनी ब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा, असं अवाहन करण्यात येत आहे. तर, शनिवारी कल्याण-वांगणी दरम्याम ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा- मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान लोकल नियोजित थांब्यांवर थांबतील. तर, ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड येथे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.
ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड – माटुंगादरम्यान नियोजित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. सीएसएमटी – पनवेलदरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे – पनवेलदरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नाही.
पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरी – कांदिवलीदरम्यान पाचव्या मार्गिकेवर ब्लॉक असणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
ब्लॉक कालावधीत वांद्रे टर्मिनसवरून निघणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस अंधेरी – बोरिवलीदरम्यान डाऊन जलद मार्गावरून धावतील. तसेच काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.
कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी मध्य रेल्वे शनिवारी रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेवटची कर्जत लोकल ११:५१ वाजता सीएसएमटीतून सुटणार आहे. कल्याण आणि वांगणी दरम्यान एफओबीचे मुख्य गर्डर उभारणीसाठी विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्यरात्री १:३० ते ३:३० या कालावधीत दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकपूर्वी कर्जत येथे जाणारी शेवटची लोकल सीएसएमटी येथून रात्री ११:५१ वाजता सुटेल आणि कर्जत येथे १:४९ वाजता पोहोचेल, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.