IND VS NZ 3rd Test : मुंबईत सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियातील फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विन (R Ashwin) तसेच भारताच्या इतर गोलंदाजांनी दिवसाअंती न्यूझीलंडच्या 9 विकेट्स घेतल्या. दुसऱ्या दिवसाच्या अंती न्यूझीलंडची टीम 143 धावांनी आघाडीवर आहे.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा टेस्ट सामना खेळवला जात आहे. गुरुवारी या सामन्याच्या पहिल्या दिवशी न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीची निवड केली आणि भारताला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. यावेळी भारताच्या गोलंदाजांसमोर न्यूझीलंडने 10 विकेट्स गमावून 235 धावा केल्या. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने न्यूझीलंडची ही आघाडी मोडीत काढली आणि त्यांनी 263 धावा केल्या. यावेळी टीम इंडियाकडून फलंदाजी करताना शुभमन गिलने 90 आणि ऋषभ पंतने 60 अशा सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने 38, यशस्वी जयस्वालने 30, रोहितने 18 तर जडेजाने 14 धावा केल्या. टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 10 विकेट्स गमावून 263 केल्या.
न्यूझीलंडच्या फलंदाजीची दुसरी इनिंग सुरु असताना पहिल्या दोन टेस्ट प्रमाणे ते यावेळी देखील टीम इंडियाला विजयासाठी मोठं आव्हान देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या भारताच्या अनुभवी गोलंदाजांसमोर न्यूझीलंडचे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. आर अश्विनने न्यूझीलंडच्या 4 विकेट्स घेतल्या यात विल याँग, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, टॉम ब्लंडेल या स्टार फलंदाजांचा समावेश होता. तर रवींद्र जडेजाने न्यूझीलंडच्या 3 विकेट्स घेतल्या यात डॅरिल मिशेल, ईश सोधी आणि मॅट हेनरी यांचा समावेश होता.