Yuvraj Singh father On Kapil Dev: भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगीराज सिंग भारताला पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कपिल देव यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्याला कर्णधार असलेल्या कपील देवने संघातून वगळल्याने याला ठार करण्याचा विचार मनात आला होता, असं योगीराज सिंग यांनी म्हटलं आहे. त्यावेळी नेमकं काय काय घडलं होतं याचा सविस्तर तपशील योगीराज सिंग यांनी सांगितला आहे. भारतीय संघ 1980-81 साली झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये योगीराज सिंग हे भारतीय संघाचा भाग होते. त्यावेळेस ते एक कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने या दौऱ्यात खेळले होते. त्यांना संघातून वगळण्यात आल्यानंतर झालेल्या राड्याबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे.
"कपिल देव भारताचा तसेच नॉर्थ झोन आणि हरिणाया संघाचा कर्णधार झाला तेव्हा त्याने माझं नाव काहीही कारण नसताना वगळलं होतं," अशी आठवण योगीराज सिंग यांनी सांगितली. त्यांनी 'अनफिल्टर्ड बाय समधीश' या शोमध्ये दिलेल्या विशेष मुलाखत दिली आहे. त्यातच त्यांनी हा खुलासा केला आहे. "मी कपिल देवला याबद्दल प्रश्न विचारावेत असं माझ्या पत्नीचं (युवराजच्या आईचं) म्हणणं होतं. मात्र मी या माणसाला जन्माची अद्दल घडवणार आहे, असं तिला सांगितलं होतं," अशी माहिती योगीराज सिंग यांनी दिली.
"मी माझं पिस्तुल काढलं आणि थेट कपिल देवचं सेक्टर 9 मधील घर गाठलं. तो त्याच्या आईबरोबरच घराबाहेर आला. मी त्याला अनेक शिव्या घातल्या. तुझ्यामुळे मी माझा एक चांगला मित्र गमावला, असंही त्यावेळेस मी त्याला म्हणालो. तू जे काही केलं आहे ते तुला फेडावं लागणार आहे," असं मी कपिल देवला म्हणालो होतो, अशी आठवण योगीराज सिंग यांनी सांगितलं. पुढे बोलताना, "मी त्याला म्हणालो की, "मला तुझ्या डोक्यात गोळी घालायची आहे. मात्र इथे उभ्या असलेल्या तुझ्या आईकडे पाहून मी असं काही करत नाहीये." इतकं बोलून मी 'शबनम' चल इथून, म्हणत निघालो," अशी माहिती योगीराज सिंग यांनी दिली.
नक्की वाचा >> 'युवराज मेला असता तरी...', योगीराज यांचं बेधडक विधान! म्हणाले, 'रक्ताच्या उलट्या होताना...'
"त्या क्षणापासून मी ठरवलं की यापुढे मी क्रिकेट खेळणार नाही. माझ्याऐवजी युवराज क्रिकेट खेळेल असं ठरवण्याचा हाच तो क्षण होता," असं योगीराज सिंग म्हणाले.
दिवंगत क्रिकेटपटू आणि एकेकाळचे सहकारी बिशन सिंग बेदी यांच्यावरही योगीराज सिंग यांनी गंभीर आरोप केले. "त्या माणसाने माझ्याविरुद्ध कट केला. मी बिशन सिंग बेदीला कधीच माफ करणार नाही," असं योगीराज सिंग म्हणाले. "मला संघातून वगळण्यात आल्यानंतर मी निवड समितीमधील रविंद्र चड्डा यांच्याशी बोललो. त्यावेळी त्यांनी बिशन सिंग बेदींनी (त्यावेळे ते निवड समितीचे अध्यक्ष होते) योगीराज सिंग संघात नको अशी भूमिका घेतली होती. कारण त्यांना मी सुनिल गावसकरांच्या टोळीतील खेळाडू वाटत होतो. यामागील कारणं असं होतं की मी मुंबईतून खेळायचो आणि मी गावसकरांचा निकटवर्तीय होतो," असं योगीराज सिंग म्हणाले.