रणजी खेळाडूंना एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? IPL च्या तुलनेत त्यांचा पगार किती?

Ranji Player Salary: रणजी खेळाडूंचा पगार त्यांचा अनुभव आणि सामन्यांमधील सहभाग यावर अवलंबून असतो.  

शिवराज यादव | Updated: Jan 31, 2025, 05:38 PM IST
रणजी खेळाडूंना एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? IPL च्या तुलनेत त्यांचा पगार किती? title=

Ranji Player Salary: भारतातील प्रमुख देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीकडे सध्या संपूर्ण देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागलं आहे. याचं कारण विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma), ऋषभ पंत (Rishabh Pant), शुभमन गिल (Shubhman Gill) आणि यशस्वी जैसवाल (Yashavi Jaiswal) यांच्यासारखे भारतीय संघातील स्टार खेळाडू रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धा खेळण्याची अट घातली असल्याने फॉर्म गवसण्यासाठी हे खेळाडू आपापल्या राज्यांच्या संघातून खेळत आहेत. 

रणजी ट्रॉफी खेळाडू प्रत्येक सामन्यातू किती कमावतात?

अनेक क्रिकेटप्रेमींना रणजी ट्रॉफी खेळाडू प्रत्येक सामन्यातून किती पैसे कमावत असतील असा प्रश्न पडतो. गेल्या काही वर्षात त्यांच्या पगारात बदल झाले आहेत. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेटर्सना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या पगारात वाढ करण्याकरिता आढावा घेत आहे. 

रणजी खेळाडूंचा पगार वाढवण्यासाठी बीसीसीआयचा प्रयत्न

गेल्या अनेक काळापासून रणजी ट्रॉफी खेळाडूंना आयपीएल कराराच्या तुलनेत फार कमी पगार मिळत असल्याचं वाटत आहे. त्यांची हीच भावना लक्षात घेत बीसीसीआयने सुधारित वेतन रचना आणली आहे, जेणेकरुन रणजी खेळाडूंना आर्थिक सुरक्षा मिळेल. 

सध्याची वेतन रचना कशी आहे?

रणजी ट्रॉफीतील खेळाडूचा पगार अनुभव आणि सामन्यांमधील सहभागानुसार बदलतो. 40 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये खेळलेल्या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये दररोज 60 हजार रुपये मिळतात, तर राखीव खेळाडूंना 30 हजार रुपये मिळतात. 21 ते 40 सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंना दररोज 50 हजार रुपये मिळतात, तर कमी अनुभवी क्रिकेटपटूंना (0-20 सामने) 40 हजार रुपये मिळतात. नॉन-प्लेइंग संघातील सदस्यांनाही दररोज 25 हजार रुपये मिळतात.

बीसीसीआयचा पगार वाढवण्याचा विचार

बीसीसीआय देशांतर्गत आणि आयपीएल खेळाडूंमधील उत्पन्नातील तफावत कमी करण्यासाठी सध्या प्रयत्न करत आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील चर्चा करून, बोर्ड देशांतर्गत सामन्यांचं मानधन आणखी वाढवण्याचा विचार करत आहे. आयपीएलमध्ये भाग न घेणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमधून शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी हा प्रस्ताव आहे.

या प्रस्तावात मानधन दुप्पट करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे देशांतर्गत खेळाडू पूर्ण रणजी हंगाम खेळल्यास त्यांना दरवर्षी 75 लाख ते 1 कोटी रुपये मिळतील. सध्याच्या वेतनश्रेणीनुसार, जर एखाद्या वरिष्ठ खेळाडूचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो सुमारे 25 लाख रुपये कमवू शकतो, तर इतर खेळाडू 17 ते 22 लाख रुपये कमवू शकतात.

आकाश चोप्राने केलं होतं भाष्य

भारताचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्राने देशांतर्गत खेळाडूंच्या पगारासंदर्भात खुलासा केला होता. "ते आता किती कमावतात हे मला नक्की माहित नाही, पण पूर्वी खेळाडूंना दररोज 10 हजार रुपये मिळत असत, त्यापूर्वी ते आणखी कमी होते. मला आठवतं की 1997 मध्ये रणजी ट्रॉफीमधून माझा पहिला पगार 1700 रुपये होता. त्यानंतर, तो हळूहळू वाढू लागला," असे चोप्राने राज शमानीच्या पॉडकास्टवर सांगितलं होंत. 

"पण आयपीएल सुरू झाल्यानंतर, तुम्हाला स्थानिक क्रिकेटसाठी जास्त पैसे येत असल्याचे दिसून आले कारण बीसीसीआयचा महसूल वाढला. तुमचे प्रतिदिन मानधन 10 हजार रुपये होते आणि नंतर तुम्हाला बोर्डाच्या नफ्यातून काही टक्के रक्कम मिळत असे. मानधन प्रति सामन्यासाठी 1 ते 1.5 लाख करण्यात आले. जर तुम्ही एका वर्षात 8-10 सामने खेळले असतील, तर तुम्ही 10 ते 15 लाख रुपये कमवू शकता," असं तो पुढे म्हणाला.