Shivsena Ashok Dhodi Dead Body: पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या कारच्या डिक्कीतच त्यांचा मृतदेह आढळला आहे. अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यांचं अपहरण झाल्याचा संशय कुटुंबाकडून व्यक्त केला जात असतानाच गाडीच्या डिक्कीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह अशोक धोडींचाच असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. यामुळे आता या तपासाला वेगळं वळण मिळालं आहे.
20 जानेवारीला संध्याकाळी अशोक धोडी यांची लाल रंगाची ब्रिझा कार गुजरातच्या दिशेनं गेली असल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. त्यामुळे अशोक धोंडी बेपत्ता झाले नसून त्यांचं अपहरण झाल्याचा आरोप आता कुटुंबियांनी केला होता. तसंच संशयित आरोपींची नावंही कुटुंबियांनी पोलिसांना दिलीय होती. गेल्या 12 दिवसांपासून पोलीस प्रकरणाचा तपास करत असतानाच अशोक धोडी यांची कार गुजरातमध्ये सापडली. भिलाडजवळील सरिग्राम मालाफलिया इथे एका बंद दगड खाणीत त्यांची गाडी सापडली. घटनास्थळी तातडीनं पालघर पोलिसांचं पथक दाखल झालं होतं. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटीलही स्वतः घटनास्थळी पोहोचले होते.
पोलिसांनी पाण्यातून अशोक धोडी यांची गाडी बाहेर काढली. गाडी बाहेर काढून तिची पाहणी केली जात असतानाच डिक्कीत अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला आहे. यामुळे आता बेपत्ता प्रकरणाला हत्येचं वळण लागलं आहे.
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी वेवजी पोलीस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांच अपहरण केल्याचा अशोक धोडी यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर चौकशीसाठी आलेला संशयित आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला होता. घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाशचा शोध सुरू आहे.