Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे नाराज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं पण छगन भुजबळ यांना मात्र यावेळी मंत्रीपद मिळालं नाही. त्यानंतर नाराज झालेले भुजबळ या ना त्या कारणाने आपली नाराजी बोलून दाखवत आहेत. नुकत्याच पुण्यातील जाधवर इंस्टिट्यूटमध्ये आलेल्या प्रकट मुलाखत त्यांनी भाजपासोबत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले. याच वेळी राज्यपाल म्हणून संधी मिळाली तर काय यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
या मुलाखतीत छगन भुजबळ राज्यपाल होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितलं की, राज्यपाल होणे म्हणजे तोंडाला कुलूप लावण्यासारखे आहे. ते खूप मोठे पद आहे. मी त्या पदाचा अवमान करत नाही. पण माझे काम गोर गरिबांचे कल्याण करणे आहे. राज्यपाल झालो तर भटक्या विमुक्त जातीसाठी मी काही करू शकत नाही. यामुळे मी सध्या आहे, तसाच बरा आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्त्वासंदर्भातही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केलं. भुजबळ म्हणाले की, अजित पवार हे चांगले आहेत. पण शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवार यांच्यात जो फरक आहे, तो आहे.
मनोज जरांगे यांच्या विरोधासाठी तुमचा वापर केला का? असा प्रश्न त्यांनी विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, माझा वापर कोणी करु शकत नाही. आरक्षणासाठी मी गोरगरीब जनतेसाठी लढलो आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आमदारांची घरे जाळली. त्यानंतर मी मैदानात उतरलो. राजीनामा देऊन मी त्या लढाईत उतरलो होतो. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुमिका घेतली त्याचा फटका मला मतामध्ये बसला. महायुतीला जे यश मिळाले, त्यात ओबीसींचा मोठा वाटा आहे.
या मुलाखतीत त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी घडलेल्या घडामोडींचा पुनरुच्चार केला. 'नाशिकमध्ये तुम्ही चांगलं काम केलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तुम्हालाच उभं राहावं लागेल, असं मला सांगितलं होतं. पण महिना उलटून गेला तरीही माझं नाव जाहीर झालं नाही. त्यामुळे मग मीच निवडणुकीतून माघार घेतली,' याचा पुनरुल्लेख भुजबळांनी केला. लोकसभा निवडणुकीत महायुतीत नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेनं लढवली होती.
'लोकसभा निवडणुकीनंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली. तेव्हा मी राज्यसभेवर जातो, असं म्हणालो होतो. पण लोकसभा निवडणुकीत पडलेल्या सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. दुसरी राज्यसभा आली तेव्हा नितीन पाटलांना पाठवण्यात आलं. त्या व्यक्तीला मी ओळखतही नाही,' असं भुजबळ म्हणाले.