Sunil Gavaskar on Rohit Sharma: न्यूझीलंडविरोधातील लाजिरवाण्या कसोटी पराभवानंतर आता भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिका (Border-Gavaskar Trophy) खेळणार आहे. 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावसकर मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला कर्णधार रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. वैयक्तिक कारणांमुळे रोहित शर्मा खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जर रोहित शर्मा पहिल्या काही कसोटी सामन्यांना मुकणार असेल तर संपूर्ण मालिकेसाठी नव्या कर्णधाराची नियुक्ती करायला हवी असं मत मांडलं आहे. घऱच्या मैदानावर न्यूझीलंडविरोधात 0-3 ने मालिका गमावल्यानंतर आता बॉर्डर-गावसकर मालिकेसाठी संपूर्ण संघ एका कर्णधाराच्या नेतृत्वात एकत्र आला पाहिजे असं सुनील गावसकर म्हणाले आहेत. सुनील गावसकर यांच्या विधानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच व्यक्त झाला आहे.
"रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं आम्ही वाचत आहोत. कदाचित तो दुसरा कसोटी सामनाही खेळणार नाही. जर असं असेल तर मी आताच सांगतोय की, भारतीय निवड समितीने त्याला सांगावं, 'जर तुला आराम करायचा असेल तर आराम कर. जर वैयक्तिक कारणं असतील तर त्यात लक्ष घाल. पण जर तू दोन-तीन सामने गमावणार असशील तर मग या दौऱ्यात फक्त एक खेळाडू म्हणून जा. आम्ही तुला या दौऱ्यात उप-कर्णधार करु'", असं सुनील गावसकर 'स्पोर्ट्स तक'शी संवाद साधताना सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "भारतीय क्रिकेट सर्वात महत्त्वाचं आहे. जर आपण न्यूझीलंडविरोधातील मालिका 3-0 ने जिंकलो असतो तर गोष्ट वेगळी होती. पण आपण 0-3 ने मालिका गमावली असल्याने आता नव्या कर्णधाराची गरज आहे. जर सुरुवातीलाच कर्णधार नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी कर्णधार करणं जास्त चांगलं होईल".
अॅरॉन फिंच मात्र सुनील गावसकर यांच्या मताशी सहमत नाही. त्याने म्हटलं आहे की, "मी पूर्णपणे सुनील गासवकर यांच्याशी असहमत आहे. रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. जर तुमच्या पत्नीला बाळ होणार असेल आणि त्यासाठी विश्रांती घेत असाल तर हा फार सुंदर क्षण आहे. तुम्ही यासाठी हवा तितका वेळ घेऊ शकता".