विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सध्या प्रचारांचा धुरळा उडाला असून, नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. तसंच अनेक नेते, पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मातोश्रीवर (Matoshree) आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) उपस्थितीत एका मोठ्या नेत्याचा पक्षप्रवेश पार पडला आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांनी आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्याने अखिल चित्रे नाराज होते. वांद्रे पूर्व येथेून मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे ते खूप नाराज होते.
तृप्ती सावंत यांना शेवटच्या क्षणी आयात करून मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे अखिल चित्रे यांनी नाराजी जाहीर केली होती. अखिल चित्रे यांनी 2019 मध्ये वांद्रे पूर्व येथून मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यांना जवळपास ११ हजार मतं मिळाली होती. मनसेच्या टेलिकॉम सेनेचे अखिल चित्रे हे कार्याध्यक्ष होते.
वरळीसाठी जे करायला हवं होतं ते शिंदे गटाने केलं नाही, असं यांचं मतं आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपा मुंबई लुटू पाहत आहे. हे पाप ते करत आहेत. महाराष्ट्रची आर्थिक घडी पुन्हा एकदा बसवायची आहे . मागच्या आठवड्यात अजित पवार गटाचे पदाधिकारी आले होते. आज शिंदे गटाचे आले. या सगळ्यांचा मी स्वागत करतो असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.