'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...'

सध्या फॉर्मशी संघर्ष करणारे रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना निवड समितीचा प्रमुख गौतम गंभीर (Gautam Gambhir) संघाबाहेर काढूच शकणार नाही असं मनोज तिवारीने (Manoj Tiwary) म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 10, 2025, 06:40 PM IST
'गौतम गंभीर रोहित, विराटला संघाबाहेर काढूच शकणार नाही'; माजी खेळाडूने दाखवला आरसा, 'तुम्ही कर्णधार असताना...' title=

भारतीय क्रिकेट संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर सर्व बाजूंनी टीका होत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) धावा कऱण्यात अयशस्वी ठरत असल्याने सिडनी कसोटी सामन्यातून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने रोहित शर्माने कर्णधार म्हणून अखेरचा सामना खेळायला हवा होता असं मत मांडलं आहे. तसंच रोहित शर्माने न खेळण्याचा निर्णय त्याने स्वत: घेतला होता. याचं कारण मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) विराट कोहली (Virat Kohli) किंवा रोहित शर्माला संघातून बाहेर काढू शकत नाही असंही त्याने म्हटलं आहे. 

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेतील तीन सामन्यात फक्त 31 धावा करु शकला. सिडनी कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आल्यानंतर त्याला व्यवस्थापनाने संघातून वगळल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रोहित शर्माने सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपण स्वत: न खेळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली. संघात फॉर्ममध्ये नसणाऱ्या खेळाडूंना स्थान देणं परवडणारं नाही असं कारण त्याने सांगितलं. भारताने 1-3 ने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 

"मला वाटतं रोहित शर्माने निर्णय घेतला. तो त्याचा स्वत:चा निर्णय होता. मला वाटत नाही की विराट कोहली किंवा रोहित शर्मा यांना गौतम गंभीर कधी ड्रॉप करु शकेल. मला वाटतं हा रोहितचा निर्णय होता. रोहितने कर्णधार असल्याने सिडनी सामना खेळायला हवा होता. आपल्याकडून धावा होत नसल्याचं कारण त्याने सांगितलं, पण त्या तर इतरांकडूनही होत नव्हत्या. कधीकधी इतर कोणाला बाहेर काढण्यापेक्षा आपण बाहेर जावं असा विचार केला जातो. तुम्ही स्वत:च्या क्षमतांवर शंका घेत असून, इतरांच्या क्षमतांना आपल्यापेक्षा वरचं स्थान देत आहात," असं मनोज तिवारीने 'हिंदुस्तान टाईम्स'शी संवाद साधताना सांगितलं.

"कर्णधार म्हणून हे केलं जाऊ नये, मला वाटतं रोहित शर्माकडे खूप कौशल्य आहे. त्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे. फलंदाज, गोलंदाज सर्वांचा खडतर काळ येत असतो. प्रशिक्षकांनाही त्याचा सामना करावा लागतो. या गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. तुम्ही पुनरागमन करुन धावा करु शकता. पण मला वाटतं त्याने माघार घेण्याची गरज नव्हती. पण त्याने हे संघाच्या भल्यासाठी केल्याचं दिस आहे. एक कर्णधार नात्याने तुम्ही मालिका सुरु असताना स्वत:ला बाहेर काढू शकत नाही," असंही त्याने म्हटलं.