पर्थ : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा ३१ रननी विजय झाला. पहिल्या इनिंगमध्ये शतक आणि दुसऱ्या इनिंगमध्ये अर्धशतक करणारा पुजारा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये १-०नं आघाडी घेतली आहे. या सीरिजची दुसरी टेस्ट मॅच शुक्रवार १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. पण या मॅचआधी भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताचा विकेट कीपर ऋषभ पंतला इशारा दिला आहे.
या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतनं ३८ बॉलमध्ये २५ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १६ बॉलमध्ये झटपट २८ रनची खेळी केली. ऋषभ पंतच्या दुसऱ्या इनिंगमधल्या खेळीवर अनेकांनी टीका केली. भारतीय टीमला गरज असताना पंतनं बेजबाबदार फटके मारल्याचा आक्षेप काही माजी क्रिकेटपटूंनी घेतला. यावर शास्त्रींनी प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ पंतला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू द्या. त्याला आणखी थोडी जबाबदारी दाखवावी लागेल. पण त्यानं ही चूक पुन्हा करता कामा नये, असा सल्ला शास्त्रींनी ऋषभ पंतला दिला.
या मॅचमध्ये पंतनं एका टेस्टमध्ये सर्वाधिक कॅच पकडण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऋषभ पंतनं या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ६ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ५ असे एकूण ११ कॅच घेतले. याआधी जॅक रसेल यांनी १९९५ साली इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका मॅचमध्ये आणि एबी डिव्हिलियर्सनं २०१३ साली दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचमध्ये ११ कॅच घेतले होते.
भारताकडून सर्वाधिक कॅच घेणाच्या विक्रम याआधी ऋद्धीमान सहाच्या नावावर होता. पंतनं २०१८ साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये १० कॅच घेतले होते. बॉब टेलर आणि ऍडम गिलख्रिस्ट यांच्या नावावरही १० कॅचचं रेकॉर्ड आहे.
भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कॅच घेण्याचं रेकॉर्ड याआधी महेंद्रसिंग धोनीच्या नावावर होतं. २०१४ साली मेलबर्नमध्ये धोनीनं ९ कॅच घेतले होते.
ऋषभ पंतनं त्याच्या पहिल्याच टेस्ट मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये ५ कॅच पकडण्याचं रेकॉर्डही केलं होतं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये हे रेकॉर्ड करणारा पंत पहिला भारतीय आहे. यावर्षी नॉटिंगहम टेस्टमध्ये पंतनं हे रेकॉर्ड केलं होतं.