मुंबई : टी-20 वर्ल्डकपच्या पुढील सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला पाकिस्तानविरुद्ध 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. तर आता वर्ल्डकपमध्ये पुढील सामन्यात भारताला टिकून राहण्यासाठी न्यूझीलंडला कोणत्याही परिस्थितीत हरवावं लागणार आहे. या 'करो या मरो'च्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला एक मोठी खुशखबर मिळालीये.
न्यूझीलंडच्या T20 वर्ल्डकपमध्ये मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन मंगळवारी पाकिस्तानविरुद्धच्या संघाच्या पहिल्या सामन्यापूर्वी दुखापतीमुळे बाहेर पडला. भारतासाठी ही बातमी खूप चांगली आहे कारण पुढच्या सामन्यात टीम इंडियाला या घातक गोलंदाजाकडून मोठा धोका होता. आयसीसीच्या समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर वेगवान गोलंदाज अॅडम मिल्ने 15 जणांच्या संघात त्याची जागा घेणार आहे.
न्यूझीलंड क्रिकेटने सांगितलं की, फर्ग्युसनला सोमवारी रात्री सरावानंतर पायामध्ये दुखापत असल्याचं जाणवलं. यानंतर एमआरआय स्कॅन करण्यात आला ज्यामध्ये ही दुखापत समोर आली. ही दुखापत बरी होण्यासाठी तीन ते चार आठवडे लागण्याची शक्यता आहे.
शारजाह क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा 5 विकेट्स राखत पराभव केला. टॉस हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत न्यूझीलंडच्या टीमने 8 विकेट्स गमावून 134 रन्स केले. तर पाकिस्तानने 18.4 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून लक्ष्य पूर्ण केलं.
सामन्याचे हिरो ठरलेल्या शोएब मलिक (26) आणि आसिफ अली (27) यांच्या उत्कृष्ट भागीदारीमुळे टीमने पुन्हा एकदा विजय मिळवला. पाकिस्तानने सलग दुसऱ्यांदा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विजयाची नोंद केली आहे.