Margashirsha 2024 : 4 की 5 यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती? विनायक चतुर्थीला पहिला गुरुवारचा योग

Margashirsha 2024 : यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 किती गुरुवारचं व्रत असणार आहे. सोबतच मार्गशीर्ष महिन्यामुळे 31 डिसेंबरचा आनंद कमी होणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Dec 1, 2024, 05:02 PM IST
Margashirsha 2024 : 4 की 5 यंदा मार्गशीर्ष गुरुवार किती? विनायक चतुर्थीला पहिला गुरुवारचा योग  title=
Margashirsha 2024

Margashirsha 2024 : डिसेंबर महिन्याला सुरुवात झाली असून हा इंग्रजी कॅलेंडरमधील शेवटचा महिना आहे. हिंदू धर्मात मराठी महिन्यांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक मराठी महिना हा खास असून त्यातील व्रत वैकल्य अतिशय महत्त्वाचे असतात. 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. कुटुंबात धन, धान्य आणि समृद्धी राहावी. सगळ्यांचं आरोग्य उत्तम राहवं म्हणून सुवाहिनी महिला हे व्रत करतात. त्यासोबत श्रावणानुसार मार्गशीर्ष महिन्यातही नॉनव्हेज आणि मद्यपान महिनाभर वर्ज्य असतं. त्यामुळे अशावेळी 31 डिसेंबरवर मार्गशीर्ष महिन्यामुळे आनंद घेता येणार आहे की नाही. शिवाय मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 किती गुरुवारचं व्रत आहे. याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

मार्गशीर्ष महिना किती तारखेपर्यंत असणार?

सोमवारी 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार असून 30 डिसेंबरपर्यंत असणार आहे. 30 डिसेंबरला मार्गशीर्ष अमावस्यानंतर 31 डिसेंबरपासून पौष महिन्याला सुरुवात होणार आहे. याचा अर्थ 31 डिसेंबरला तुम्ही नॉनव्हेजचा आनंद घेऊ शकणार आहात. 

मार्गशीर्ष महिन्यात 4 की 5 किती गुरुवारचं व्रत?

यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे. 5 डिसेंबर 2024 मार्गशीर्ष गुरुवारसोबत विनायक चतुर्थीचं संयोग आहे. त्यानंतर 12 डिसेंबरला दुसरं मार्गशीर्ष गुरुवार, 19 डिसेंबरला तिसरं मार्गशीर्ष गुरुवार आणि 26 डिसेंबरला चौथ आणि शेवटचा गुरुवार व्रत असून यादिवशी 2024 ला सफला एकादशीचं व्रत असणार आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात 4 गुरुवारचं व्रत असणार आहे. 

अशी करा घटाची मांडणी!

घरातील ज्या ठिकाणी घट बसवायचे आहे तिथे गोमुत्र शिंपडल्यानंतर स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा. त्यानंतर रांगोळी काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. चौरंग किंवा पाटावर लाल कपडा परिधान करा. आता मध्य भागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा. कळशात दुर्वा, पैसे आणि सुपारी घाला. आंब्याची पाच पान ठेवून त्यावर नारळ ठेवावा. या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता. अगदी कळशाला ब्लाऊज पीसने सजवा. आता लक्ष्मीला दागिन्यांनी शृंगार करा. कळशाला चारही बाजून हळद-कुंकू लावा. चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि श्रीयंत्र ठेवा. देवीपुढे पाच फळं, लक्ष्मी कवडी यांची मांडणी करावी. तसंच देवीपुढे पाच पानांचा विडा ठेवावा. नैवेद्य म्हणून लाह्या, गुळ, बाताशे नक्की ठेवा. 

असं करा महालक्ष्मीचं व्रत !

मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीच्या प्रतिकात्मक स्वरुपात घट बसवण्याची परंपरा आहे. यासाठी बाजारात खास महालक्ष्मी देवीचे मुखवटा आणि पोशाख उपलब्ध आहेत. दर गुरुवारी घट बसून महालक्ष्मीची पूजा करुन हार वेणी किंवा गजरा अर्पण केला जातो.

गुरुवारी सकाळी घट बसल्यानंतर सकाळी संध्याकाळी घटाची पूजा केली जाते. महिला दिवसभर उपवास करु संध्याकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. तर मार्गशीर्ष महिन्याच्या चौथ्या गुरुवारी उद्यापन करण्यात येतं. यादिवशी एखाद्या विवाहित महिलेची खण साडीने ओटी भरावी. त्याशिवाय महिलांना हळदी कुंक, फुल आणि वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन गुरुवारचं उद्यापन करतात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)