हॅलोविन? छे-छे... ही तर भूत चतुर्दशी! भारतात कुठे आणि कशी होते सेलिब्रेट?

Bhoot Chaturdashi 2024: हॅलोविन... परदेशात साजरा होणारा हा दिवस, किंबहुना ही एक रात्र सध्या चर्चेचाच विषय ठरताना दिसतेय. भारतातही अशीच एक पद्धत प्रचलित आहे माहितीय?   

सायली पाटील | Updated: Nov 2, 2024, 12:22 PM IST
हॅलोविन? छे-छे... ही तर भूत चतुर्दशी! भारतात कुठे आणि कशी होते सेलिब्रेट? title=
bhoot Chaturdashi what is the day and celebration is all about

Bhoot Chaturdashi 2024: भूताखेतांसारखा पेहराव, भेदरवणारा चेहरा आणि तसेच काहीसे हावभाव... असं काहीतरी करून एखादी व्यक्ती समोर आली तर थरकाप उडल्यावाचून राहणार नाही. प्रत्यक्षात एक असा दिवस असतो, जेव्हा याच घाबरवणाऱ्या रुपाचं कुतूहल असतं. परदेशात याच दिवसाला 'हॅलोविन' म्हणून साजरा करतात. जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल, पण भारतातसुद्धा असाच काहीसा दिवस साजरा केला जातो. 

दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केल्या जाणाऱ्या या दिवसाला म्हणतात भूत चतुर्दशी, स्थानिकांच्या भाषेत 'काली चौदस'. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला ही तिथी असते. काही भागांमध्ये हा दिवस छोटी दिवाळी म्हणूनही प्रचलित आहे. या दिवसाचा थेट संबंध श्रीकृष्णानं केलेल्या नरकासुराच्या वधाशी जोडला जातो. 

पश्चिम बंगालमध्ये साजरा केल्या जाणाऱ्या या 'भूत चतुर्दशी'च्या दिवशी वाईट शक्ती अधिक सक्रिय असतात असतात, तर प्रेतआत्मा त्यांच्या प्रियजनांच्या भेटीसाठी आलेल्या असतात असं सांगितलं जातं. असंही म्हटलं जातं की, या दिवशी पूर्वज प्रियजनांना भेटण्यासाठी येतात, ज्यासाठी दिवे लावून त्यांचं स्वागत केलं जातं. 

हेसुद्धा वाचा : हातापायाची बोटं एकसारखी का नसतात? 

 

भूत चतुर्दशीच्या दिवशी घरातील कोपरान् कोपरा प्रकाशमान करण्यासाठी 14 दिवे लावले जातात. पूर्वजांच्या 14 पिढ्यांच्या स्मरणात हे दिवे लावले जातात. वाईट शक्तींना दूर पळवण्यासाठी या दिवशी चामुंडा देवीचीही पूजा केली जाते. ज्यासाठीही मातीचे 14 दिवे प्रज्वलित केले जातात. 

भूत चतुर्दशीच्या निमित्तानं अनेक घरांमध्ये चौदा विविध पद्धतीच्या पालेभाज्यांचा नैवेद्य केला जातो. ज्यामुळं वाईट शक्ती दूर राहतात अशी धारणा आहे. पश्चिम बंगालमध्ये या दिवशी  लहान मुलांना घराबाहेर निघू देत नाहीत, यामागे कैक कारणं.... 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)