विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी

पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 30, 2025, 08:05 PM IST
विहिरीतील पाण्याने गिया बार्रे पसरला? पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची जोरदार चर्चा, आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी title=

पुण्यात गिया बार्रे आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या आजारामुळे पुण्यातील एका विहिरीची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगलीय. अनेक जण येतात विहिरीत डोकावतात आणि फोटोसेशन करून निघून जातात. या विहिरीची एवढी चर्चा झाली की राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनीही या विहिरीची पाहणी केली. नेमकं पुण्याच्या नांदेडगावातील ही विहिर काय चर्चेत आली? पाहुया सविस्तर 

ही आहे पुण्याच्या नांदेडगावातील चार गावांची तहान भागवणारी विहिर. ही विहिर पर्यटन स्थळ आहे की काय अशी परिस्थीती निर्माण झालीय. त्याचं झालं असं की पुण्यात गिया बार्रे आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढायला लागलेत. या रुग्णांची संख्या ही सिंहगड रोड, नांदेडगाव, धनकवडी या भागात अधिक आहे. रुग्णसंख्या अधिक असलेल्या गावांना नांदेडगावातील या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातोय. या विहिरीतील दुषित पाण्यामुळेच गियाबार्रे रुग्णांची संख्या वाढत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलीय. मग काय ही विहिर पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमू लागली.. हौसे, गौसे, नवसे सगळेच ही विहिर पाहण्यासाठी येताहेत आणि फोटो काढून निघून जाताहेत. जणू की हे पर्यटनस्थळच आहे.  

आरोग्यमंत्र्यांकडून विहिरीची पाहणी

तसं पाहिलं तरी ही वेळ 1988 साली गावाला पाणी मिळावे म्हणून पाण्याची टाकी आणि विहीर बांधण्यात आली होती. तेव्हापासून या विहिरीचे पाणी चार गावांना दिले जाते. मात्र आता या विहिरीचे पाणी नागरिक पित नाहीत कारण गिया बार्रे सिंड्रोमची बाधा होईल म्हणून पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या विहिरीतील पाणी शुद्ध असून पिण्यायोग्य असल्याचा अहवाल नुकताच दिलाय ते आरोग्यमंत्र्यांनी ही पाने शुद्ध असल्याचे सांगितले.

पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची एवढी चर्चा झाली की राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनीही या विहिरीची पाहणी केली. त्यासोबतच केंद्रिय आरोग्य पथकानेही या विहिरीची पाहणी केलीय.

सुप्रिया सुळेंकडून विहिरीची पाहणी

पुण्याच्या नांदेडगावातील विहिरीची एवढी चर्चा रंगली असताना खासदार सुप्रिया सुळे यांनीही या विहिरीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधलाय. तर नांदेडगावातील या विहिरीची चर्चा एवढी झाली की त्या विहिरीची चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतलीय. 

या विहिरीतील पाणी पिण्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे याची पडताळणी प्रशासनाने करणं गरजेचं आहे.. मात्र या विहिरीची चर्चा सुरू झाल्यानं लोकांनी याच पर्यटन स्थळ बनवलंय.