मुंबई : आपल्यापैकी प्रत्येक जण आजकाल मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडियावर आपण दररोज शेकडो मॅसेज वाचतो. काही मॅसेज तर ग्राहक हितार्थ म्हणून व्हायरल झालेले असतात. पण, यातील किती मॅसेजमध्ये खरं काही तथ्य असतं याची सत्यता आपण पडताळून पाहत नाही. यातील काही मॅसेज तर आपणही सरळ पुढे पाठवून देतो. म्हणूनच यातील निवडक काही मॅसेजचं सत्य आम्ही तुमच्या समोर आणणार आहोत.
१. सीमेवर झेंडा फडकवणारे जवान
देशभरातील केंद्रीय विद्यापीठांत झेंडा लावण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा भाजपचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना सीमेवर भारतीय जवान तिरंगा फडकवत असल्याचा फोटो दाखवला. खरं तर हा फोटो फोटोशॉप केला होता. त्यातील जवान भारतीय नसून अमेरिकन होते. पुलित्झर पुरस्कार प्राप्त झालेला हा फोटो जपानमधील इवो जिमा इथला आहे. विशेष म्हणजे हा फोटो दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४५ साली काढला गेला होता.
२. भारतीय मुलीला नासाचे निमंत्रण
गेल्या काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका मुलीला नासाने इंटर्नशिप दिल्याची बातमी माध्यमांध्ये पसरली. पुढे ही बातमी सोशल मीडियावरही व्हायरल झाली. भारतासाठी अभिमानाची बाब वगैरे संदेश त्यासोबत जोडले गेले. पण, पुढे नासानेच ही बातमी खोटी असल्याची वाच्यता केली. बातम्यांमध्ये नमूद केलेली शिष्यवृत्ती आणि इंटर्नशिप केवळ अमेरिकन नागरिकांना मिळत असल्याचे नासाने सांगितले आणि या बातमीवर पडदा पडला.
३. चेन्नई पुरादरम्यान पंतप्रधानांचा हवाई दौरा
नोव्हेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे तामिळनाडू राज्यात आणि चेन्नई शहरात पुराने थैमान घातलं. या पुरादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी दौरा केला खरा. पण, प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने जारी केलेला फोटो मात्र फोटोशॉप केलेला होता. पुढे त्यांना यावर सफाई द्यावी लागली. या फोटोमुळे सरकारला अनेक विनोदांचाही सामना करावा लागला.
४. कर्णधार धोनी आणि त्याची मुलगी जीवाची पहिली झलक
काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि त्याची मुलगी जीवा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. पण, शेवटी धोनीच्या पत्नीलाच तो फोटो आणि व्हिडिओ खरं नसल्याचं जाहीर करावं लागलं आणि या अफवेवर पडदा पडला.
५ मार्क झुकरबर्गचं ४५ अब्ज डॉलर्सचं दान
आपल्या मुलीच्या जन्मानिमित्त मार्क झुकरबर्ग ४५ अब्ज डॉलर्स दान करणार असल्याची बातमी काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली. पण, ही बातमी अफवा नसली तरी ते अर्धसत्य होते. मार्कने खरं तर आपल्या मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावे स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कमाईच्या ९९ टक्के रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा हा निर्णय होता.
६. अनुराग कश्यप एका डोळ्याने आंधळा झाला
अनुराग कश्यपने काही महिन्यांपूर्वी त्याच्या जखमी डोळ्याचा एक फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केला. अनेक वृत्तपत्रांनी आणि इतर माध्यमांनी आपापल्या परीने त्याने एक डोळा शूटिंग दरम्यान गमावल्याच्या बातम्या दिल्या. पण, अनुरागने नंतर माध्यमे कशा प्रकारे खात्री न करता खोट्याच बातम्या पसरवतात याचा एक प्रयोग करण्यासाठी हा प्रताप केल्याचे सांगितले.
७. मिस्टर बिन अपघातात ठार झाला
मिस्टर बिन साकारणारा सर्वांचा लाडका अभिनेता २०१३ साली एका विमान अपघतात ठार झाल्याची बातमी जगभरात वणव्यासारखी पसरली. ही बातमी जेव्हा त्याने ऐकली तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. पण, नंतर त्यानेच आपण एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून जिवंत असल्याचे माध्यमांसमोर येऊन सांगितले.
८. आजारी व्यक्तींना मदत करण्याचे आवाहन
अनेक आजारी व्यक्तींच्या नावाने आपल्याला व्हॉट्सअॅपवर आर्थिक मदतीसाठी मॅसेज येतात. आपल्यातील काही जण या मॅसेजची दखल घेऊन यातील व्यक्तींना मदत करण्याचा विचार करतात. पण, आजपर्यंत यातील बहुतेक मॅसेज म्हणजे आर्थिक घोटाळे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे असे मॅसेज वाचून भावूक होण्यापेक्षा त्याची खात्री करणे महत्त्वाचे आहे.
९. पल्स कँडी खाण्याचे धोके
लोकप्रिय अशी पल्स कँडी खाल्याने तोडांची चव घेण्याची क्षमता लोप पावू शकते आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका असतो, अशा आशयाचे काही मॅसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, या मॅसेजमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. ही कँडी विषारी तर मुळीच नाही.
१०. एमएच-१७ विमानाला बॉम्बच्या मदतीने पाडल्याचा व्हिडिओ
मलेशियन एअरलाईनच्या विमानाला इजिप्तमध्ये बॉम्बच्या मदतीने पाडल्याचा व्हिडिओ काही दिवसांपू्र्वी व्हायरल झाला होता. पण, शेवटी मात्र हा व्हिडिओ खोटा असल्याचे निष्पन्न झाले.