अश्विनी पवार, पुणे : पुण्यात बाळ चोरीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांची झोप उडाली होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत बाळचोरीचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
कोथरूडमधून आपलं अवघ्या दोन महिन्यांचं बाळ चोरीला गेल्याची तक्रार एका महिलेनं केली होती. काही लोकांनी जबरदस्तीनं बाळ हातातून पळवून नेल्याचं या मातेनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या घटनेची कसून चौकशी सुरू केली आणि मुलाच्या आईलाच काही प्रश्न विचारले. तेव्हा आईच्या बोलण्यात संशय आल्यानं त्यांनी पोलिसी खाक्या दाखवला... आणि अखेर तिचं बिंग फुटलं...
आपणचं आपल्या चिमुकल्याच्या अपहरणाचा बनाव रचल्याचं तिनं मान्य केलं. बाळ बहिणीला दत्तक देण्यासाठी तिच्याकडून दोन लाख रुपये घेणार होतो, असंही तिनं कबूल केलंय. याप्रकरणी पोलिसांनी दोघा बहिणींना अटक केलीय.
अवघ्या एका दिवसात पोलिसांनी एका आईच्या कृत्याचा पर्दाफाश केला. आणि गणेशला त्याच्या वडलांकडे सुखरुप पाठवलंय. आई म्हटल्यावर प्रेमळ आणि मायेची मूर्ती नजरेसमोर येते. मात्र या घटनेनं आई या शब्दाला कलंक लागलाय, एवढं नक्की...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.