शिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करून हत्या, एकाला अटक

शिर्डीतल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. एका २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

Updated: May 17, 2015, 10:50 PM IST
शिर्डीत २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करून हत्या, एकाला अटक title=

शिर्डी: शिर्डीतल्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.. एका २३ वर्षीय तरुणाचं अपहरण करुन त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.

सागर शेजवळ असं या मृत तरुणाचं नाव असून तो शिर्डीत नर्सिंगचं शिक्षण घेत होता.

शनिवारी दुपारी सागरला ५ जणांनी उचलून नेलं.. या अपहरण नाट्याचं चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झालं. त्यानंतर शिगवे शिवारात नेऊन या आरोपींनी तरुणाला नग्न करत मारहाण करुन हत्या केली. वैद्यकीय अहवाल आला नसल्यानं त्याच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

सागरच्या हत्येची बातमी कळताच त्याच्या कुटुंबियांनी आक्रोश केला.. शिर्डीत काही ठिकाणी गाड्याही फोडण्यात आल्या. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका सागरच्या कुटुंबियांनी घेतली होती. मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर त्यांनी सागरच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. 

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केलं. दरम्यान या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आलीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.