सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक!

मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 'खलनायक' ठरलेला संजय दत्त सध्या पुण्यात येरवडा जेलची हवा खातोय. मात्र, बॉलिवूडमध्ये काही फिल्ममेकर्सकडून याच संजुबाबाला घेऊन फिल्म बनवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्यात. 

Updated: Feb 5, 2015, 10:52 AM IST
सुटका होण्याआधीच बॉलिवूडचा 'खलनायक' बूक! title=

मुंबई : मुंबईतल्या बॉम्बस्फोट प्रकरणी 'खलनायक' ठरलेला संजय दत्त सध्या पुण्यात येरवडा जेलची हवा खातोय. मात्र, बॉलिवूडमध्ये काही फिल्ममेकर्सकडून याच संजुबाबाला घेऊन फिल्म बनवण्याच्या हालचाली जोर धरू लागल्यात. 

'नायक नही खलनायक हूँ मैं' हे गाणे तुम्हाला आठवत असेलच. या गाण्याने खऱ्या अर्थाने संजय दत्तची बी टाऊनमध्ये खलनायक म्हणून ओळख निर्माण झाली. मात्र,  १९९३ बॉम्ब स्फोटामध्ये सहभागी असल्याचा ठपका संजूबाबावर लागला आणि मुन्नाभाईला तुरुंगात शिक्षा भोगायला जावे लागले. 

मात्र तुरुंगात शिक्षा भोगत असलेला संजय दत्त तुरुंगात कमी आणि बाहेरच जास्त असल्याने चर्चेत आहे. तो आता बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करेल की नाही? अशी शंका होती. पण, सगळ्या शंका खोट्या ठरवत संजय दत्त करण मल्होत्राच्या 'शुध्दी'मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे. सलमान खानची या सिनेमात प्रमुख भूमिका असून त्यासाठी अभिनेत्रीचा शोध सुरु आहे. हिरोइन कोण हे ठरण्याआधीच सिनेमाचा व्हिलन ठरला असून तीच भूमिका मुन्नाभाईने खिशात घातलीय.

संजय दत्तने याआधी करण मल्होत्रा बरोबर अग्निपथमध्ये काम केलंय. अग्निपथमध्ये संजुबाबाने साकारलेली कांचाचीनाची भूमिका रसिकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे संजुबाबाच्या या नव्या खलनायकाकडूनही त्याच्या चाहत्यांना प्रचंड अपेक्षा असणार आहे. 

शुध्दी हा सिनेमा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. करण मल्होत्रा आधी हा सिनेमा ह्रतिक रोशनला घेऊन करणार होता. मात्र, काही कारणास्तव ह्रतिकने हा सिनेमा सोडला. त्यानंतर रणवीर सिंग, आमिर खान यांच्या नावाचीही चर्चा होती. हा प्रोजेक्ट बंद होण्याची चिन्हे असतानाच सलमान खान करणच्या पाठिशी उभा राहिला. त्यामुळे 'शुध्दी' या करणच्या महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टवर पुन्हा एकदा काम सुरु झाले असून संजुबाबाही आपल्या लाडक्या मित्राच्या पाठिशी उभा राहिलाय. त्यामुळे सल्लुभाई-मुन्नाभाईची जुगलबंदी रसिकांना कितपत आवडते हे तर येणारा काळच सांगेल.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.